Monday, December 23, 2024
Homeराज्यआकोट सूतगिरणीच्या मालमत्ता करात तडजोड?…कर कमी केल्याच्या चर्चेने सदस्यांमध्ये असंतोष…सरपंच विरोधात सर्व...

आकोट सूतगिरणीच्या मालमत्ता करात तडजोड?…कर कमी केल्याच्या चर्चेने सदस्यांमध्ये असंतोष…सरपंच विरोधात सर्व सदस्य एकवटले…ग्रामपंचायत दप्तरात कर भरणा केल्याची नोंद नाही…

आकोट – संजय आठवले

आकोट तालुका सहकारी सूतगिरणीची काही मालमत्ता ग्रामपंचायत वडाळी सटवाईचे हद्दीत येते. सूतगिरणीवर चढलेला लक्षावधी रुपयांच्या मालमत्ता करा संदर्भात सरपंच व गिरणी खरेदीदार तडजोड करीत असून या करात मोठी सूट देण्यात येत असल्याच्या वार्तेने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.

या विरोधात सत्ताधारी व विरोधी मिळून सर्वच सदस्य एकवटले असून या संदर्भात पंचायत समिती आकोट कडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र या सवलती संदर्भात ग्रामपंचायत दप्तरात कोणतीही नोंद आढळून आली नसल्याचे चौकशी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अवसायनात निघालेल्या आकोट तालुका सहकारी सूतगिरणीचा रीतसर लिलाव करण्यात आलेला आहे. लिलावा करिता ५.१.२०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या निविदेमध्ये सूतगिरणीकडे असलेल्या दायित्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये मालमत्ता करापोटी २.८.२०१४ पर्यंत ८० लक्ष ६० हजार ७०३ रुपये देणे असल्याचे दर्शविलेले आहे.

हे देणे मान्य करून खरेदीदाराने सूतगिरणी लिलावात खरेदी केली. यासोबतच विविध शासकीय देणी तथा कामगारांचे १४ कोटी ८५ लक्ष रुपयांचे देणेही खरेदीदाराने द्यावयाचे आहे. गिरणीचा ताबा घेतल्यानंतर खरेदीदाराने शासनाच्या विविध देण्याचा आकोट तहसीलमध्ये भरणा केलेला आहे. मात्र ग्रामपंचायतचा मालमत्ता कर आणि कामगारांचे देणे अद्याप बाकी आहे.

अशा अवस्थेत ग्रामपंचायत वडाळी सटवाईने खरेदीदाराकडे मालमत्ता करापोटी १ कोटी ६१ लक्ष ५० हजार रुपयांची मागणी केली आहे. त्यावर खरेदीदाराने ही रक्कम एकमुष्ठ अंशदान पद्धतीने देण्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त आहे. या पद्धतीने कराचा भरणा करतेवेळी रकमेत सवलत देणेकरिता सरपंच व ग्राम सचिव यांचेशी खरेदीदाराने वाटाघाटी केल्या असून हा व्यवहार पूर्ण झाल्याची चर्चा आहे.

हा व्यवहार पूर्ण करणेकरिता सरपंच आणि ग्रामसचिव यांनी मोठी लाच घेतल्याचेही बोलले जात आहे. सोबतच या करापोटी खरेदीदाराने ३१ लक्ष रुपयांचा धनादेश आमदार भारसाकळे यांचे कडे सोपविल्याची आणि त्यांनीच मध्यस्थी करून ही तडजोड घडवून आणल्याचीही चर्चा आहे. या चर्चेने वडाळी सटवाई ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यांना ही तडजोड नाही तर गिरणीकडे तुंबलेल्या कराची संपूर्ण रक्कम हवी आहे. परंतु या संदर्भात सरपंचाने कोणत्याही सदस्याशी काहीच चर्चा न केल्याने सदस्यांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे.

अतिशय कोपायमान झालेल्या या सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी यासंदर्भात पंचायत समिती आकोट येथे तक्रारी केल्या आहेत. एक तक्रार सत्ताधारी गटाचे सदस्य अंकुश पुरुषोत्तम कुलट व मुजाहिद खान मुकद्दर खान यांनी तर दुसरी तक्रार विरोधी गटाचे सदस्य अब्दुल सईद अब्दुल जब्बार, सौ. आशा गोवर्धन रेळे, सौ. निर्मला संतोष रेळे, सौ. रुबीना नूर कमरुद्दिन, सौ. बबीता दीपक रेळे व सतीश निरंजन वानखेडे यांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अकोला यांना दिलेल्या तक्रारीमध्ये आकोट तालुका सहकारी सूत गिरणीचा कर पूर्णत: वसूल करणेबाबत ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना आदेशित करण्याची विनंती करण्यात आली आहे.

याच अनुषंगाने आकोट पंचायत समितीचे विस्तार अधिकारीद्वय मदनसिंग बहुरे आणि जितेंद्र नागे यांनी ग्रामपंचायत वडाळी सटवाई येथे जाऊन चौकशी केली. ग्रामपंचायत मधील कर मागणी बुक, कर वसुली बुक, मालमत्ता रजिस्टर यांची तपासणी केली. यामध्ये सूतगिरणीचे खरेदीदार यांचेकडून कराचा कोणताही भरणा केल्या गेल्याची नोंद आढळून आली नाही.

त्यामुळे खरेदीदारांना सवलत दिल्याचे तथा खरेदीदारांनी भरणा केल्याचे दिसून आले नाही. मात्र ‘या संदर्भात आम्ही सारी प्रक्रिया पार पाडून कर भरणा केल्यानंतर ग्रामपंचायतीने दिलेला नील चा दाखला आपल्याकडे आहे’ असे खरेदीदाराचे गोटातून सांगितल्याचे काही ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात सरपंच आणि ग्रामसचिव यांनी मोठी चिरीमिरी घेतल्याची सदस्यांची धारणा झालेली आहे.

मजेदार म्हणजे या प्रकरणात आमदार भारसाखळे यांनी मध्यस्थी करून ३१ लक्ष रुपयांचा धनादेश आपल्याकडे घेतल्याची अफवा पसरविण्यात आल्याचेही ध्यानात आले आहे. ही अफवा पसरविण्यामागील कारण हे आहे कि, सूतगिरणी मालमत्ता कराची बोलणी सुरू असल्याचे ध्यानात येऊन कोणी तक्रार करू नये याकरिता या प्रकरणात आमदार सामील असल्याची अफवा पसरविण्यात आली असल्याची शक्यता आहे.

अर्थात ही अफवा ही बोलणी करणाऱ्यांकडूनच पसरविली गेली असल्याचीही शक्यता आहे. मात्र आमदार भारसाखळे हे सूतगिरणी खरेदीदारांचे विरोधात असल्याचे त्यांनी सूतगिरणी फेरफार व सातबारा नोंदीवर घेतलेल्या आक्षेपाने सिद्ध झालेले आहे.

त्यामुळे मालमत्ता करात सवलत देण्याचे या प्रयोगात बऱ्याच अफवांनी बाजार गरम केल्या जात असल्याचे दिसत आहे. परंतु तरीही आपल्या नावाची अशी अफवा कोण पसरवीत आहे, याची आमदार भारसाखळे यांनी माहिती घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे या प्रकरणातील बरीच तथ्ये बाहेर येऊ शकतात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: