नरखेड – सावरगाव बस स्टॉप चौकात अस्ताव्यस्त पार्क केलेल्या गाड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली. त्याबाबत पोलीस हेल्पलाईन नंबर ११२ वर सामाजिक कार्यकर्ते पवन गजबे यांनी माहिती दिली. याचा वचपा काढण्याकरिता नरखेड पोलीस स्टेशन चे दोन शिपायांनी पवन गजबे यांच्यासह शुभम गोंडाणे याना जबर मारहाण केली. याप्रकरणी दोषी शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन युवक मंच चे राहुल गजबे यांनी केली आहे.
पँथर सेनेचे सामाजिक कार्यकर्ते पवन गजबे यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी (६ डिसेंबर) रात्री १०.१५ वाजता सावरगाव बस स्टॉप येथे अस्तव्यस्त पार्क केलेल्या गाड्यामुळे अपघात होऊ नये म्हणून पोलीस हेल्पलाईन ११२ वर माहिती दिली. त्यानंतर त्याला नरखेड पोलीस स्टेशन मधून कॉल आला व विचारणा झाली. ” फोन कोणी केला? ” यावर पवन गजबे यांनी फोन मीच केला व सध्या मी बस स्टॉप चौकात आहे असे सांगितले. ” तिथेच थांबा ,आम्ही येत आहोत ” असे पवन ला सांगण्यात आले. थोड्याच वेळात पोलिसांची जीप बस स्टॉप चौकात आली.
जीप मधून शिपाई रवी साठवणे यांनी पवन गजबे यांना जवळ बोलावले व तक्रार का केली म्हणून कोणतीही विचारणा न करता , थापड मारण्यास सुरवात केली. ” तुम्ही याला का मारता ” म्हणून शुभम गोंडाणे याने विचारणा केली असता पोलीस शिपाई जाकीर शेख याने शुभम गोंडाणे यालाही मारहाण सुरू केली. इतकेच नाही तर पवन व शुभम यांना पोलीस जीप मध्ये कोंबून नरखेड पोलीस स्टेशन मध्ये नेले. तिथेसुद्धा त्यांना दोन्ही शिपायांनी मारहाण केली.
दोघांच्याही कोऱ्या कागदावर सह्या घेऊन त्यांना यापुढे कुठेही तक्रार करायची नाही असा दम देऊन सोडण्यात आले. मारहानीची संपुर्ण घटना बस स्टॉप परिसरातील व पोलीस स्टेशन च्या सीसीटीव्ही कॅमेर्यात रेकॉर्ड झाली आहे. याबाबत पोलीस शिपाई रवी साठवणे व जाकीर शेख यांच्या विरुद्ध नरखेड पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यात आली . परंतु पोलीस प्रशासनाने दोषी विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही.
पवन गजबे व शुभम गोंडाणे हे पँथर सेनेचे कार्यकर्ते आहेत. गावातील अवैध धंद्या विरुद्ध ते नेहमी आवाज उठवितात . याचाच वचपा रवी साठवणे व जाकीर शेख यांनी काढला आहे. त्यांचे मनोबल खच्चीकरण करून यापुढे त्यांनी अवैध धंद्याबाबत तक्रार करू नये याकरिताच ही मारहाण करण्यात आली. ही घटना घडली तेंव्हा दोन्ही पोलीस शिपाई दारू पिऊन टून्न होते. घडलेल्या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक व पोलीस महानिरीक्षक यांचे कडे तक्रार दिली आहे.
पोलीस अधिकारी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवरकारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे . असे झाल्यास पँथर सेना व रिपब्लिकन युवक मंच तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती राहुल गजबे यांनी दिली आहे. प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती वरीष्ठाना दिली असून दोषी वर योग्य कारवाई करण्यात येईल. अशी माहिती ठाणेदार जैपालसिंग गिरासे यांनी दिली.