सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाचीच; जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आणखी वाढेल.
विठ्ठला, राज्यातील बळीराजाचे अवकाळी पावसापासून रक्षण कर.
मुंबई – राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करतील,असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा व विधानसभानिहाय चर्चा केली जाईल. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच आहे.
या मतदारसंघातून मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच राहील असे स्पष्ट करत सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ताकदीने उभा रहात आहे, जिल्ह्यात कोणताही गट-तट नाही, सर्वजण एकसंधपणे काम करत आहेत. तरुणही मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात सहभागी होत असून जनतेच्या आशिर्वादाने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा चांगली कामगिरी करेल.
विठ्ठला, राज्यातील बळीराजाचे अवकाळी पावसापासून रक्षण कर.सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. चतुर्थीच्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन म्हणजे दुग्ध-शर्करा योग आहे. विठ्ठल-रुक्मिणी हे गरीब, सर्वसामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी जनतेचे दैवत आहे तसेच वारकरी संप्रदायाचे माहेर आहे.
बळीराजा आज अस्मानी संकटाने घेरला असून असंवेदनशील खोके सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आता विठ्ठलानेच बळीराजाचे अस्मानी, अवकाळी पावसापासून रक्षण करावे, अशी प्रार्थना केल्याचे पटोले म्हणाले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सुधीर महाराज घोडके यांनी नाना पटोले यांचा तुळशीहार, उपरने आणि विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला.