सांगली – ज्योती मोरे
27 जानेवारी रोजी सांगलीतील वानलेसवाडी हायस्कूल मधील सुमारे 37 विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारा शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर मळमळणे पोटदुखी तसेच उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने या सर्व विद्यार्थ्यांना सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी वगळता बाकी सर्व विद्यार्थ्यांना कालच डिस्चार्ज देण्यात आला होता. या एका विद्यार्थ्यालाही आज सकाळी साडेअकरा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान हे अन्न पुरवणाऱ्या हौसाबाई रुपनर महिला बचत गटाचा ठेका महापालिकेकडून थांबवण्यात आला असून, सदर संस्थेचे किचनही सील करण्यात आले आहे. सदर संस्थे ऐवजी आता नीलाक्षी बहुउद्देशीय महिला मंडळाला सदर ठेका देण्यात आल्याचं व सर्व नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर चौकशी समितीमार्फत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली.