Monday, December 23, 2024
Homeराजकीयउपसरपंच निवडणुकीमध्ये, थेट निवडून आलेले सरपंच मतदानास पात्र…. शासनाची स्पष्टोक्ती…. काहींना दिलासा...

उपसरपंच निवडणुकीमध्ये, थेट निवडून आलेले सरपंच मतदानास पात्र…. शासनाची स्पष्टोक्ती…. काहींना दिलासा तर काहींची गोची…

आकोट – संजय आठवले

राज्यभरात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून सरपंच थेट जनतेतून निवडून आल्याने आता उपसरपंच पदाच्या निवडणुकीकरिता संबंधितांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत थेट निवडून आलेले सरपंच मतदान करू शकतील काय? या प्रश्नाला शासनाने पूर्णविराम दिला असून हे सरपंच थेट निवडून आले असले तरी उपसरपंच निवडणुकीत भाग घेऊ शकत असल्याचे आदेश शासनाने पारित केलेले आहेत.

या आदेशाने मात्र काही लोकांना दिलासा मिळाल्याचे तर काहींची गोची झाल्याचे चित्र आहे. राज्यभरात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काही ठिकाणी सरपंचांसहित पूर्ण पॅनल निवडून आलेले आहे. तर काही ठिकाणी सरपंच एका पॅनलचा तर बहुमत दुसऱ्या पॅनलचे असे चित्र आहे. बऱ्याच ठिकाणी अपक्षांचीही सरशी झालेली आहे. अशा स्थितीत उपसरपंच निवडणुकीला चांगलेच महत्त्व प्राप्त झालेले आहे.

ज्या ठिकाणी सरपंचासहित त्याचे पॅनल निवडून आलेले आहे, त्या ठिकाणी उपसरपंच आपसूकच त्या गटाचा होणार हे निश्चित आहे. मात्र ज्या ठिकाणी सरपंचांचे बहुमत नाही त्या ठिकाणी उपसरपंच निवडून आणण्याकरिता सरपंचांचा कस लागणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी निवडून आलेल्या अपक्ष सदस्यांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. मात्र उपसरपंचांच्या निवडणुकीत थेट निवडून आलेले सरपंच भाग घेऊ शकतात काय? हा मोठा प्रश्न उभा झालेला होता.

कारण प्रत्येक ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निश्चित केलेली असते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यकारणी अंतर्गत कोणत्याही मतदानात त्यांना मतदानाचा अधिकार असतोच. परंतु ग्रामपंचायतींच्या निर्धारित सदस्यांव्यतिरिक्त सरपंच हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे या निर्धारित सदस्यांमध्ये त्यांची गणना होऊ शकते काय? आणि त्यामुळे ते उपसरपंच निवडणुकीत हिस्सा घेऊ शकतात काय? हे प्रश्न ऐरणीवर आलेले होते. अशा स्थितीत न्यायालयीन आदेशाचा हवाला देत शासनाने त्या प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे.

त्याकरिता शासनाचे कक्ष अधिकारी सुनील माळी यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी आदेश पारित केलेला आहे. या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे कि, “उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल व सदर निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल.

उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे व उपसरपंच यांची निवड करणे कायदयाने बंधनकारक असल्याने उपसरपंच निवडणूकीचे अध्यक्षस्थान भूषवून त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंच यांच्या कर्तव्याचा भाग आहे. उपसरपंच पदाची निवडणूकीची सभा तहकुब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार सदरची सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घेण्यात यावी.

उपसरपंचाच्या निवडणूकीकरीता अपरिहार्य कारणास्तव सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असतील तर जिल्हाधिकारी यांनी सदर कारणाची खातरजमा करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम ३३ मधील पोट कलम ६ (४) मधील तरतुदीस अनुसरुन तात्काळ पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावी. जेणे करून विहित कालावधीमध्ये पंचायतीचे गठन होणे शक्य होईल.”

या आदेशाने उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच भाग घेऊ शकतात की नाही? या प्रश्नाचे निराकरण झालेले आहे. मात्र अनेकांसाठी हा आदेश वरदान ठरला आहे. तर अनेकांच्या आनंदावर विरजण ठरला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: