Sunday, December 22, 2024
Homeराज्यसाह‍ित्‍य समाजाला द‍िशा देणारे – सुधीर मुनगंटीवार…पद्मगंधाच्‍या ५ व्‍या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य संमेलनाचे...

साह‍ित्‍य समाजाला द‍िशा देणारे – सुधीर मुनगंटीवार…पद्मगंधाच्‍या ५ व्‍या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य संमेलनाचे थाटात उद्घाटन….

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर -साह‍ित्‍य हे मनोरंजनाचे साधन नसून समाजाला दिशा देणारे आयुध आहे. साह‍ित्‍याने केवळ मनाचेच नाही तर मेंदू व हृदयाचे समाधान होते आणि हे समाधान चिरकाल टिकणारे असते, असे मत सांस्‍कृत‍िक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केले.
पद्मगंधा प्रतिष्ठान – नागपूरच्‍या 5 व्‍या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्‍या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. साई सभागृह, महाराष्ट्र राष्ट्रभाषा संकुल येथे शनिवारी या दोन दिवसीय संमेलनाला प्रारंभ झाला.

मंचावर साहित्य संमेलनाध्‍यक्ष सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे, स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील यांच्‍यासह विशेष अतिथी म्‍हणून कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, साहित्य अकादमी पुरस्कृत जेष्ठ लेखिका आशा बगे, जेष्ठ लेखिका डॉ .भारती सुदामे, सुप्रसिद्ध शेफ मा.विष्णू मनोहर, सामाज‍िक कार्यकर्ते व लेखक शंकरराव जाधव, पद्मगंधा प्रतिष्‍ठानच्‍या अध्‍यक्ष शुभांगी भडभडे, उपाध्‍यक्ष प्रभा देऊस्‍कर यांची उपस्‍थ‍िती होती.

विदर्भातील ग्रामीण भागात आजही अनेक साह‍ित्यिक चांगली साह‍ित्‍य न‍िर्मिती करीत आहे. त्‍यांचे साह‍ित्‍य नागपूर, मुंबईसारख्‍या शहरामध्‍ये आणण्‍यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्‍याकरिता सर्पोटीव सिस्‍टीम निर्माण करण्‍याची काम करण्‍याची गरज असून पद्मगंधाने त्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा, असे सांगताना सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍यासाठी सर्वतोपरी मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले.
यावेळी मराठी भाषेचा शोध घेणा-या ‘गर्जते मराठी’ या स्‍मरणिकेचे तसेच, सुधीर राठोड यांचे ‘नर्मदे हर’ या पुस्‍तकाचे प्रकाशन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

डॉ. पंकज चांदे मराठी या प्राचीन भाषेचे वैश‍िष्‍ट्य सांगताना संमेलनाला शुभेच्‍छा दिल्‍या तर आशा बगे यांनी शुभांगी भडभडे यांनी नवोद‍ित, प्रस्‍थाप‍ित लेख‍िकांना पद्मगंधाच्‍या माध्‍यमातून संधी दिल्‍याबद्दल त्‍यांचे कौतुक केले. डॉ. रवींद्र शोभणे यांचे भाषण वाचून दाखवण्‍यात आले. त्‍यांनी आपल्‍या भाषणातून स्‍त्रीविषयक प्रश्‍न हे सनातन असून त्‍याकडे पारंपरिक पद्धतीने न पाहता नव्‍या दृष्‍टीने पाहणे आवश्‍यक असल्‍याचे सांग‍ितले. भारती सुदामे व शंकरराव जाधव यांनी संमेलनाला शुभेच्‍छा दिल्‍या. शंकरराव जाधव यांनी पद्मगंधाला एक लाख रुपयांची देणगी दिली.

स्‍वागताध्‍यक्ष अजय पाटील यांनी आपल्‍या भाषणातून प्रत्‍येक मराठी माणसाने भाषेच्‍या संवर्धनासाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक असल्‍याचे सांग‍ितले. सातासमुदापार मराठीजन पताका फडकवत असून मराठी संस्‍कृती समृद्ध असून समन्‍वयवादी आहे, असे ते म्‍हणाले. प्रास्‍ताविकातून शुभांगी भडभडे यांनी पद्मगंधाच्‍या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष प्रदीप दाते, लेख‍िका सुप्रिया अय्यर, जयश्री रुईकर, रोह‍िणी फाटक या ह‍ितचिंतकांचा सत्‍कार करण्‍यात आला. शीतल लोहकरे यांनी गणेशवंदना सादर केली. सूत्रसंचालन वर्षा देशपांडे, संगीता वाईकर, नेहा मुंजे, स्‍वामी मोहरील, शमा देशपांडे, मीना मोरोणे, शुभांगी गाण, जयश्री हजारे, डॉ. लीना न‍िकम यांनी केले. प्रभा देऊस्‍कर यांनी आभार मानले.

ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ
5 व्‍या राज्‍यस्‍तरीय साह‍ित्‍य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. संमेलनाध्‍यक्ष डॉ. प्रज्ञा आपटे यांच्‍या हस्‍ते ग्रंथांचे पूजन करून दिंडीला प्रारंभ करण्‍यात आला. यावेळी स्‍वागताध्‍यक्ष अजय पाटील, पद्मगंधा प्रतिष्‍ठानच्‍या अध्‍यक्ष शुभांगी भडभडे व इतर कार्यकारिणी सदस्‍य मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित होते. दिंडीमध्‍ये मनाचे श्‍लोक व गणेशस्तोत्र पुस्‍तकांचे वितरण करण्‍यात आले. वर्षा देशपांडे यांनी लिहिलेल्‍या दिंडी गीतावर उपस्‍थ‍ितांनी फेर धरला व फुगडी घातली. अतिशय उत्‍साहात ग्रंथदिंडी संमेलनस्‍थळी पोहोचली.

आपल्‍याकडील लेखकाला सन्‍मान म‍िळत नाही
डॉ. प्रज्ञा आपटे यांची खंत
विदर्भातील साह‍ित्य‍िकांच्‍या साह‍ित्‍याची आपल्‍याकडील माणसे दखल घेत नाही. त्‍यांचा सन्‍मान केला जात नाही, अशी खंत डॉ. प्रज्ञा आपटे यांनी अनेक दाखले देत व्‍यक्‍त केली. साह‍ित्‍य‍िकांना सन्‍मान द्यायचा असेल तर त्‍यांच्‍या नाळ जुळवावी लागते, त्‍यांच्‍याशी संबंध राखावे लागतात आणि हे कार्य शुभांगी भडभडे पद्मगंधाच्‍या माध्‍यमातून सातत्‍याने करीत आल्‍या आहेत, असे डॉ. प्रज्ञा आपटे यांनी सांग‍ितले.
……

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: