सांगली – ज्योती मोरे.
डिजिटल माध्यमांचा वापर वाढलेला आहे, डिजिटल माध्यम हेच भविष्यात प्रभावी माध्यम ठरणार आहे, मात्र त्याचा वापर करताना, त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू समजून घेऊन, त्याबाबत अधिक सजग व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे समन्वयक शिवाजीराव पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या सांगली जिल्हा पत्रकार संघाच्या डिजिटल संघटनेच्या वतीने केडब्लूसी महाविद्यालय येथे ‘ डिजिटल मीडिया ‘ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, उद्योजक मनोहर सारडा, अविनाश कोळी, प्रवीण शिंदे, डिजीटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराजे जाधव, प्रशिक्षक मोहसीन मुल्ला, परशराम पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी डॉ.शिवाजी पाटील यांनी डिजिटल माध्यमांसाठी कायदेशीर तरतुदी या विषयावर मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, डिजिटल माध्यमांना मान्यता नाही, असे काही अधिकारी किंवा संस्था म्हणतात, परंतु ते अत्यंत चुकीचे आहे, कारण जर भारतीय दंड संहितेमध्ये डिजिटल माध्यमांना काही तरतुदी आहेत, माहिती व तंत्रज्ञान कायद्यात देखील तरतुदी आहेत, शिवाय शासनाकडून आता डिजिटल माध्यमांसाठी पुरस्कार देखील दिले जात आहेत, तर मग डिजिटल माध्यम बेकायदेशीर कसे ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. व कायदेशीर तरतुदी विशद केल्या,
त्याचबरोबर त्यांनी आपले माध्यम सामाजिक एकोपा निर्माण करेल, सार्वबहुमत्व अखंड ठेवेल यासाठी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. डिजिटल माध्यमांचे अर्थकारण आणि संधी या विषयावर डिजिटल माध्यम अभ्यासक मोहसीन मुल्ला यांनी मार्गदर्शन केले, यामध्ये डिजिटल माध्यमातून कशा प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवावे, त्यासाठीची तांत्रिक माहिती दिली. तर परशराम पाटील यांनी डिजिटल माध्यमांसाठी वृत्त संकलन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी कुलदीप देवकुळे, विकास सूर्यवंशी, विनायक जाधव, मोहन राजमाने, अभिजित शिंदे, मोहसिन मुजावर,
प्रकाश सुर्यवंशी, ज्योती मोरे, सुधाकर पाटील, गितांजली पाटील, मिलिंद पोळ यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे १५० पत्रकार आणि शिवाजी विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.