धुळे जिल्ह्यात मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे मुंबई-आग्रा महामार्गावर वेगात असलेला कंटेनर अनियंत्रित होऊन एका हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात सुमारे ९ जणांचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी झाले. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कंटेनरने इतर अनेक वाहनांना धडक दिली ज्यात प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ ब्रेक निकामी झाल्याने भरधाव वेगात असलेल्या 14 चाकी कंटेनरने थेट हॉटेलवर धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील सातपुडा पर्वत रांगेला मोठा उतार आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या कंटेनरचा ब्रेक याच उतारावर निकामी झाला. यानंतर कंटेनर थेट पलासनेर गावाजवळील हॉटेलमध्ये घुसला. अचानक घडलेल्या या घटनेने महामार्गावर एकच हाहाःकार उडाला. अपघाताची घटना घडताच स्थानिक लोक मदतीला धावून आले आणि लोकांना बाहेर काढण्यास सुरवात केली. सर्व मतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. मयतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.