नांदेड – महेंद्र गायकवाड
क्रिकेट खेळणारा गणपती, प्राणायाम करणारा गणेश, बुद्धिबळ खेळणारा विघ्नहर्ता, बॅग घेऊन प्रवासाला निघालेला लंबोदर, रुग्णाच्या तपासणीसाठी जाणारा डॉक्टर एकदंत, आराम खुर्चीत निवांत पेपर वाचणारा गजानन असे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल साडेपाचशे पेक्षा जास्त वेगवेगळ्या आकर्षक गणेश मूर्तींचा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी 33 वर्षापासून संग्रह केला आहे.
त्यांच्या या अनोख्या संग्रहात भारतातील प्रसिद्ध गणेश मंदिरातील मुर्तीच्या प्रतिकृती सोबतच नेपाळ, भूतान, थायलँड ,श्रीलंका यासारख्या देशातील गणेश मूर्ती आहेत. पुरातन गणपतीपासून ते लॅपटॉप चालवणारा आधुनिक गणपती च्या विविध छटा संग्रही आहेत. सुपारी ते शंखापर्यंत विविध वस्तु पासून बनविलेले गजाननाची असंख्य रूपे नयन मनोहरी आहेत.
विविध वाद्य वाजवणारे गणपती, सुटाबुटातील गणपती, मोबाईल धारक गणपती, फोन करणारा गणपती, घसरगुंडी खेळणारा गणपती, लहान उंदीराला पायावर घेऊन झोके देणारा गणपती, बाहुल्यांचा गणपती, धान्या पासून बनवलेला गणपती, रुचकीच्या झाडापासून बनविलेला गणपती, बसलेला गणपती, उभा असलेला गणपती, झोपलेला गणपती, गल्ल्यावर बसलेला गणपती, दो-या पासून बनवलेला गणपती, गणेश मुखी दुर्मिळ रुद्राक्ष, नारळात कोरलेला गणपतीची विविध रूपे पाहण्यासाठी गणेशोत्सवात दरवर्षी अनेक भाविक येत असतात.
तब्बल ३३ वर्षापासून नांदेडच्या एसटी कर्मचारी गणेश मंडळाला ठाकूर हे आवर्जून गणेशमूर्ती देत असतात. दरवर्षी वेगवेगळी मूर्ती द्यावी या उद्देशाने त्यांनी मूर्तिकाराला दाखवण्यासाठी जमा केलेल्या छोट्या मुर्त्यांचे आता विशाल संग्रहात रूपांतर झाले आहे. ठाकूर यांची गणेश भक्ती माहीत असल्यामुळे अनेक परिचित त्यांना आढळलेली नाविन्यपुर्ण मूर्ती आणून देतात. देशातील बहुसंख्य गणेश मंदिरांचे त्यांनी दर्शन घेतलेले आहे.
त्यांच्या संग्रहातील एक मूर्ती अष्टविनायका सह अनेक नामवंत मंदिरातील मुख्य मूर्तीला स्पर्श करून आणलेली आहे. या मूर्ती समोर दिलीपभाऊ दररोज गणपती स्तोत्राचे पठण करून पूजा करतात. हा संग्रह सुस्थितीत रहावा यासाठी दिलीप ठाकूर यांच्या पत्नी जयश्री ठाकूर, मुली नेहा व पूजा , भाऊ राजेशसिंह, नातू अर्णवसिंह हे परिश्रम घेत असतात. दिलीप ठाकूर यांच्या या अनोखा गणेश भक्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.