Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsदेवेंद्र फडणवीस यांच्या पत्राने खळबळ...नवाब मलिक यांना महायुतीत स्थान नाही...

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राने खळबळ…नवाब मलिक यांना महायुतीत स्थान नाही…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आज पहिल्यांदाच विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने नागपूरला आले. नवाब मलिक यांनी सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मलिक विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसले. त्यांनतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडीयावर अजित पवार यांना एक पत्र लिहले आणि त्यात थेट सांगितले की नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. पुढे काय म्हणाले?…

श्री. अजितदादा पवार,
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
सस्नेह नमस्कार,

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.

त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर
कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे…देवेंद्र फडणवीस

माजी मंत्री नवाब मलिक आज दिवसभर सभागृहात अजितदादा पवार यांच्या सत्ताधारी गटासोबत बसले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांना पत्रात महायुतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटल्यावर नवाब मलिक यांची कोंडी झालेली दिसते. मात्र अजितदादा यावर काय तोडगा काढतील ते येणाऱ्या दिवसात कळेल.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: