- नदीमध्ये पाणी असल्यावर शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना मारावा लागतो तीन किलोमीटरचा फेरा
- अधिकारी मंत्र्यांना निवेदने परंतु सर्व विफल
रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुक्यातील गट ग्रामपंचायत किरणापूर (वडेगाव) अंतर्गत येत असलेल्या तथा रामटेक व मौदा तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या चोखाळा येथुन सुर नदी गेलेली आहे. मात्र या नदीला पावसाळ्यामध्ये पाणी असल्यावर नदीपलीकडून गेलेल्या रस्त्यावर विद्यार्थ्यांसह विशेषता शेतकऱ्यांना जाता येत नाही त्यामुळे त्यांना जवळपास तीन किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते.
तेव्हा यामध्ये शेतकरी व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास होत असतो. तेव्हा हा त्रास वाचविण्यासाठी गट ग्रामपंचायत किरणापूरचे उपसरपंच रामेश्वर हटवार हे गेल्या कित्येक वर्षापासून या नदीवर पूल होण्यासाठी कित्येक अधिकारी, राजकिय व मंत्र्यांपर्यंत गेलेले आहे पण सर्व विफल ठरलेले आहे.
या सूर नदीच्या पलीकडूनच एक रस्ता निघून तो शॉर्टकट हायवे ला जाऊन मिळालेला आहे. नदी ते हायवे हे अंतर फक्त एक किलोमीटरचे आहे. मात्र या एक किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहे. शेतीपयोगी अवजारे तथा साहित्य नेण्यासाठी हा शॉर्टकट रस्ता त्यांना फार सोपा जात असतो मात्र पावसाळ्यामध्ये या नदीपात्रात तब्बल १२ फुटापर्यंत पाणी राहत असल्यामुळे हा रस्ता शेतकऱ्यांसाठी बंदच होऊन जातो.
त्याचप्रमाणे गावातील विद्यार्थी रामटेक सारख्या किंवा भंडारा सारख्या ठिकाणच्या शाळेमध्ये शिकत असेल तर त्यांना बस पकडण्यासाठी हायवे रस्ता याच एक किलोमीटरच्या रस्त्याने सोपा जातो. मात्र पावसाळ्यामध्ये नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यावर हा रस्ता विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांसाठी परिपूर्णरित्या बंद होत असतो तेव्हा नाईलाजास्तव विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना व्हाया अरोली मार्गाने तब्बल तीन ते चार किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत असते.
तेव्हा या सूर नदीवर पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी गट ग्रामपंचायत किरणापूरचे उपसरपंच रामेश्वर हटवार यांचेसह ग्रामस्थांनी केलेली आहे. अनेक राजकीय मंत्री तथा अधिकाऱ्यांना निवेदन सुर नदीवर पूल बनावावा यासाठी उपसरपंच रामेश्वर हटवार यांनी अनेक राजकिय, मंत्री तथा अधिकार्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले.
आपली समस्या मांडली. विविध राजकिय तथा मंत्र्यांचे पत्र घेऊन ते संबंधीत अधिकाऱ्यांना दिले मात्र त्याचा तिळमात्रही फायदा झालेला नाही. बहुतेक कुणीच या समस्येकडे जातीने लक्ष दिले नाही. तेव्हा आता कुणाचे दार खटखटवावे असा विचार त्यांच्या डोक्यात घुमजाव करीत आहे.