अमरावती – मालमत्तेचे हस्तांतरण करतांना कमी भरणा केलेल्या दस्तामध्ये महाराष्ट्र शासनाने दिनांक ०७/१२/२०२३ रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेद्वारे मुद्रांक शुल्क व दंड माफी योजना लागू करण्यात आली आहे.
ही योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. योजनेचा पहिला टप्पा कालावधी १ डिसेंबर,२०२३ ते ३१ जानेवारी,२०२४ व दुसरा टप्पा दिनांक १ फेब्रुवारी,२०२४ ते ३१ मार्च,२०२४ या दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.
या अनुषंगाने शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर,२०२३ रोजी उपायुक्त जुम्मा प्यारेवाले यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ च्या अंमलबजावणी बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ च्या अंमलबजावणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर योजनेचे नियोजन करुन रजिस्टर करण्याचे निर्देश उपायुक्तांनी दिल्या. तसेच नोंदणीकृत भाडे पट्टयावर देण्यात यावे.
या योजनेचे पहिल्या टप्प्यात सन १९८० ते २००० या कालावधीत नोंदणीकरीता दाखल केलेले अथवा न केलेले दस्ताकरीता दिनांक ०१ डिसेंबर,२०२३ ते ३१ जानेवारी,२०२४ या कालावधीत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम रु. १ लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपुर्ण रक्कम माफ केली आहे. देय होणारी रक्कम ही रु.१ लाखावरील असल्यास ५०% व दंडाच्या रक्कमेत संपुर्णत: १००% सुट देण्यात आली आहे.
या योजनेचे दुस-या टप्प्याचा कालावधी दिनांक ०१ फेब्रुवारी,२०२४ ते ३१ मार्च,२०२४ या काळात मुद्रांक शुल्क व दंड भरणा केल्यास देय होणारी मुद्रांक शुल्कांची रक्कम रु.१ लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडात ८०% सवलत दिलेली आहे. देय होणारी रक्कम ही रु.१ लाखावरील असल्यास मुद्रांक शुल्कात ४०% व दंडात ७०% सवलत दिलेली आहे.
पहिल्या टप्प्यात दिनांक ०१ डिसेंबर,२०२३ ते ३१ जानेवारी,२०२४ भरणा केल्यास देय होणारी रक्कम ही रु.१ ते २५ कोटी असल्यास मुद्रांक शुल्कास २५% माफी व देय होणारी दंडाची रक्कम ही पंचविस लाखा रु.२५,००,०००/- पेक्षा कमी असल्यास दंड रक्कमेस ९०% सवलतीचा लाभ मिळणार आहे.
मुद्रांक शुल्काची रक्कम ही २५ कोटी पेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कास २०% व दंड रक्कम रु.१ कोटी स्विकारण्यात येईल व उर्वरीत रक्कमेस सुट देण्यात येईल.
दुसरा टप्पा दिनांक ०१ फेब्रुवारी,२०२४ ते ३१ मार्च,२०२४ पर्यंत या कालावधीत भरणा केल्यास देय होणारी रक्कम ही रु.१ ते २५ कोटी असल्यास देय होणारी मुद्रांक शुल्कातून सुट ही २० टक्के देय राहील. तसेच दंड रक्कमेस रु.५० लक्ष पेक्षा कमी असल्यास देय होणा-या दंडामध्ये ८०% सुट देण्यात येईल. दंडाची रक्कम ५० लाख पेक्षा जास्त असल्यास केवळ ५०,००,०००/- दंड म्हणुन स्विकारण्यात येईल.
दुस-या टप्प्यात रक्कम ही रु.२५ कोटीपेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कात १०% सुट व दंडात रु.२ कोटी रक्कम दंड म्हणुन स्विकारण्यात येईल व उर्वरीत दंडाच्या रक्कमेत सुट देण्यात येईल.
अभय योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी ज्यांना मुद्रांक शुल्काची नोटीस प्राप्त झाली आहे. अश्यांनी अथवा ज्यांनी त्यांचे अनोंदणीकृत दस्तऐवजांवर आवश्यक मुद्रांक शुल्क शासनास अदा केला नसेल असे या कालावधीतील सर्व दस्तऐवजांना ही सवलत लागू आहे.
त्यामुळे संबंधित पक्षकार यांनी त्यांचे मूळ दस्तांसह विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावा. तसेच शासनाने जाहीर केलेल्या या सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन साहेबराव दुतोंडे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक अमरावती विभाग, अमरावती, अनिल औतकर मुद्रांक जिल्हाधिकारी अमरावती यांनी केले आहे.
या बैठकीत शहर अभियंता इकबाल खान, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.