धीरज घोलप
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने जवाहर विद्याभवन, चेंबूर येथे विभागीय आर.एस.पी. संचलन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, विक्रोळी(पश्चिम) येथील संदेश विद्यालयातील रस्ता सुरक्षा दलाच्या मुलींच्या पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या पथकाची पोलीस परेड ग्राउंड, नायगांव-मुंबई येथे होणाऱ्या मानाच्या आंतरविभागीय संचलन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दिमाखदार सोहळ्यात चेंबूर ते मुलुंड या विभागातील शाळांची ४४ पथके सहभागी झाली होती. कार्यक्रमास चेंबूरच्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइजर्सचे डायरेक्टर ए.के.मिश्रा, पोलीस उप आयुक्त (पूर्वउपनगरे-वाहतूक) डॉ. राजू भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) अभय धुरी, ट्रॉम्बे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रसाळ, वाहतूक शाखेच्या शिक्षण विभागाचे पोलीस निरीक्षक घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या सुयशप्राप्त विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणारे मुंबई वाहतूक पोलीस दलाच्या शिक्षण विभागाचे पोलीस हवालदार संजय दिघे, क्रीडा शिक्षक शिवाजी कालेकर, सुनील तांबे व सुभाष पाटील यांचे शिक्षण निरीक्षक-बृहन्मुंबई उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक संतोष कंठे, संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे, संस्थेचे विश्वस्त व शाळेचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे, संस्थेच्या विश्वस्त मेघा म्हात्रे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.