Sunday, December 22, 2024
Homeराज्यविभागीय चौकशीचे पाऊल पुढे जाईना…नेमाडेंनी केला असा काय करीना… (भाग दोन)

विभागीय चौकशीचे पाऊल पुढे जाईना…नेमाडेंनी केला असा काय करीना… (भाग दोन)

आकोट – संजय आठवले

आकोट तालुक्याच्या चोहट्टा बाजार महसूल मंडळातील धामणा बुजुर्ग येथील शेतकऱ्याच्या फेरफार मध्ये गैर कायदेशीर बदल केल्याचे आरोपात तत्कालीन मंडळ अधिकारी यांचे विरोधात सुरू असलेल्या विभागीय चौकशीमध्ये तब्बल अडीच वर्षे लोटल्यावरही काहीच प्रगती झालेली नाही. त्यामुळे जाणकारांच्या भुवया उंचावल्या असून ही चौकशी रेंगाळण्यामागे नेमके कारण काय याची चर्चा होत आहे.

मंडळ अधिकारी निळकंठ नेमाडे यांचेकडे चोहट्टा बाजार महसूल मंडळाचा प्रभार होता. तलाठी म्हणून आर. व्ही. बोकाडे हे कार्यरत होते. त्यावेळी मौजे धामणा बुजुर्ग येथील गट क्रमांक ७४ क्षेत्र ४.३२ हेक्टर आर च्या संदर्भात तलाठी बोकाडे यांनी मयत भूस्वामी गोकुलचंद रामधन गोयंका यांचे वारसास कोणतीही सूचना न देता अन्य इसमाचे नावे फेरफार नोंदविला.

या संदर्भात कोणतीही शहनिशा न करता मंडळ अधिकारी नेमाडे यांनी हा फेरफार प्रमाणित केला. ह्या प्रकाराने मयत भूस्वामीचे वारस अमित किशोर गोयंका यांनी पूर्व उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे समक्ष अपील दाखल करून न्याय मिळण्याची विनंती केली.

त्यावर उपविभागीय अधिकारी यांनी प्रकरण सुरू केले. या प्रकरणात संबंधितांच्या जाब जबान्या घेण्यात आल्या. त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५० (२) मधील तरतुदीप्रमाणे या फेरफारामध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना लेखी कळविण्यात न आल्याचे निदर्शनास आले. त्यावरून उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नेमाडे यांचा प्रमाणित केलेला फेरफार रद्द ठरवून मयत गोकुलचंद रामधन गोयंका यांचे वारसाची नोंद घेणेबाबत आदेश पारित केला.

या आदेशात त्यांनी स्पष्ट केले आहे कि, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १४९ नुसार हक्क संपादन कोणत्या पद्धतीने झाले याची कोणतीही तपासणी न करता प्रस्तुत नोंद तलाठी यांनी घेतली. तसेच त्याबाबत कोणतीही खातरजमा न करता अथवा कोणताही पुरावा न तपासता मंडळ अधिकारी यांनी नोंद प्रमाणित केली. विशेष म्हणजे ही नोंद आज रोजी अस्तित्वात नसलेल्या कायद्याचे आधारे घेण्यात आलेली असल्याचे या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आलेली आहे.

याच आदेशात पुढे म्हटले गेले आहे कि, तलाठी यांनी वाद जमिनीतील फेरफार नोंद कोणत्याही कागदपत्राशिवाय नोंदविली आहे व मंडळ अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे ती प्रमाणित केली आहे. त्यामुळे हक्कांमध्ये निष्कारण गुंतागुंत वाढवून विनाकारण कायदेशीर प्रकरण निर्माण केले गेले आहे. महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी मालकी हक्क प्रदान करण्याचे अधिकार नसताना अशा प्रकारची नोंद प्रमाणित करून अधिकार क्षेत्राबाहेरील निर्णय घेतला आहे.

त्यावर मंडळ अधिकारी नेमाडे यांनी अतिशय मजेदार जबाब दिला आहे. त्यांनी म्हटले आहे कि, अर्धन्यायिक स्वरूपाचे अधिकार प्राप्त असलेल्या महसूल विभागातील मंडळ अधिकारी कार्यालय हे First trial court म्हणून भूमिका पार पाडते. त्याच अनुषंगाने फेरफाराचा व त्यातील विवादाचा निकाल दिला जातो. त्यामुळे मंडळ अधिकारी पदास Judges protection Act 1958 कलम 2 A नुसार भादवि कलम चे ७७ आधारे उच्च न्यायालयाने Judge या पदाच्या व्याख्येत मंडळ अधिकारी हे पद ग्राह्य धरले असून याच कायद्याचे कलम ३ नुसार Judicial Officers Protection दिलेले आहे.

Ad

त्यानुसार मी कोणताही शिस्तभंग केला नसून माझे कर्तव्य पार पाडले आहे. म्हणजेच वरिष्ठांनी आक्षेपार्ह ठरविलेल्या कृतीला निळकंठ नेमाडे यांनी आपण Judicial Judge असल्याचे उत्तर दिले. परंतु ही कृती आक्षेपार्हच असल्याचे नमूद करून पूर्व तहसीलदार निलेश मडके यांनी मंडळ अधिकारी नेमाडे व तलाठी बोकाडे यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली.

त्यावर विद्यमान जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या प्रकरणातील दोषारोप सादर करणेकरिता तहसीलदार निलेश मडके यांची तर चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची नियुक्ती केली. काही काळानंतर ज्यांनी आपल्याला दोषी ठरविले त्याच अधिकाऱ्याकडे चौकशी देऊ नये असा युक्तिवाद करून नेमाडे यांनी चौकशी अधिकारी बदलून मागितला. त्यावर चौकशी करिता सदर प्रकरण उपविभागीय अधिकारी बाळापुर यांचे कडे वर्ग करण्यात आले.

ही चौकशी सुरू होऊन आज तब्बल अडीच वर्षाचे वर कालावधी उलटून गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे बदलून दिलेले चौकशी अधिकारी यांचे बाळापुर येथून स्थानांतरण झाले आहे. आणि उल्लेखनीय बाब म्हणजे बाळापुर उपविभागीय अधिकारी यांचा प्रभार आकोटचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांचेकडे देण्यात आल्याचे वृत्त आहे.

मजेदार म्हणजे उपविभागीय अधिकारी अरखराव हे नेमाडेंना आपले अधिनस्थ अधिकारी तथा आमदार भारसाखळे यांचे निकटस्थ म्हणून चांगलेच ओळखतात. त्यामुळे ह्या चौकशी प्रक्रियेवर या बाबींचा प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच तब्बल अडीच वर्षे लांबलेली ही चौकशी अजून किती काळ चालते याची प्रतीक्षा आहे.

सोबतच या प्रकरणात फसवणूक झाल्याने भूस्वामी अमित किशोर गोयंका यांचे तक्रारीवर दहीहंडा पोलिसांनी नेमाडे यांचेवर भादवी कलम ४२० चा गुन्हा दाखल केलेला आहे. ते प्रकरणही न्यायप्रविष्ठ आहे. त्यावरही काय निकाल येतो याकडे लक्ष लागले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: