Saturday, December 21, 2024
Homeराज्यमणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा : तन्जीम ए इन्साफची मागणी, भाजपाकाळात...

मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा : तन्जीम ए इन्साफची मागणी, भाजपाकाळात बेटी बचाव केवळ घोषणाच : फारुखी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

भाजपाची सरकार असलेल्या मणिपुर येथील घटनेने देशाची प्रचंड बेइज्जती झाली असून मणिपूर घटनेचा आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफ यासामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करत मणिपुर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नांदेड जिल्हा महासचिव वलिओद्दीन फारुखी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

मणिपूर मधील घटनेवर आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफचे वलिओद्दीन फारुखी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मणिपूरमध्ये आदीवासी समाजाच्या दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढणाऱ्या नराधमांचा व्हिडिओ समाजमाध्यमावर वायरल झाला. संपूर्ण देश शरमेने या घटनेमुळे मान खाली घालत आहे.

महिलांसोबतच पंतप्रधानांच्या बेटी बचाव या घोषणेचे सुद्धा धिंडवडे निघाले आहेत.शेकडो लोकांसमोर कांहीं नराधमानी सदर दोन महिलांवर सामूहिक बलात्कार करून निर्वस्त्र धिंड काढली जाते आणि दोन महिने सदर घटनेची कानकून सुद्धा जर मणिपूर प्रशासनाला लागत नसेल तर त्या ठिकाणी राज्य करण्याचा अधिकार प्रशासन प्रमुख म्हणून भाजपा मुख्यमंत्र्यांना आहे का?

प्रशासन आंधळे झालेले असल्यामुळे तेथे गुंडांची पैदाईश मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते. मणिपूर दोन महिन्यांपासून जळत असताना, अशांत असताना देशाचे पंतप्रधान मात्र शांतपणे बाहेर देशांची सफर करतात. घटनेच्या दोन महिन्यांनी सदर व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर पंतप्रधान केवळ चेतावणी देतात.

अलीकडील काळात ब्रिजभूषण, कुरुलकर, सोमय्या या भाजपाशी व संघाशी संबंधित व्यक्तिवर महिलांविषयी अनेक आरोप होतात, एक पाकिस्तानी महिला चार मुलांसह भारतात प्रवेश करते या सर्व बाबीवरून विचारावस वाटते की या देशात सरकार काय करते असा सवाल करत तात्काळ मणिपूरच्या भाजपा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा राष्ट्रपतींनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे असे प्रतिपादन फारुखी यांनी केला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: