अमरावती – दुर्वास रोकडे
यावर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी ‘महसूल पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या कालावधीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन डॉ निधी पाण्डेय यांनी केले आहे. राज्यस्तरीय महसूल दिन तसेच महसूल पंधरवडा व पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चा शुभारंभ कार्यक्रम मंत्रालयातील परिषद सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल आणि पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांची प्रमुख उपस्थिती तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त ,सर्व जिल्हाधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पंधरवड्याबाबत अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वयोश्री, लेक लाडकी, अन्नपूर्णा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची चांगली अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी असे आवाहन करण्यात आले.
नागरिक व ग्रामीण भागातील जनतेसाठी महसूल व पशुसंवर्धन देखील अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. महसूल पंधरवड्यामध्ये शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने अग्रेसर राहून सर्व विभागांसह चांगले काम करावे. शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमूख काम करावे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लोकांपर्यंत जावे.
विविध उपक्रमांच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी, सैनिकांचे कुटुंबीय, महाविद्यालयीन युवक, वयोवृद्ध नागरिक , महिला समाजातील विविध घटक यांना सामावून घेत महसूल पंधरवड्याचा हा उपक्रम यशस्वी करावा.असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले.