केसरकरजी, कर्नाटकात ५५ दिवसांनंतरही विरोधी पक्षनेता नाही.
मोदींना देश व शिंदेंना महाराष्ट्र चालवता येतो का? ते आधी पहा.
मुंबई – काँग्रेसला विरोधी पक्षनेता निवडता येत नाही ते देश काय चालवणार? हे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे विधान बालिश व अत्यंत हास्यास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही व एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र चालवत येत नाही हे जनतेला समजले आहे.
काँग्रेसने ६० वर्षांपेक्षा जास्त केंद्रातील व विविध राज्यात सरकारे चालवली आहेत, त्यामुळे देश कसा चालवायचा, हे केसरकर सारख्यांनी काँग्रेसला शिकवू नये, असा टोला प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे.
मंत्री दिपक केसरकर यांचा समाचार घेताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, केसरकर शिक्षणमंत्री असून किती अशिक्षित आहात हे त्यांनी त्यांच्या विधानातून दाखवून दिले आहे. कर्नाटकमध्ये सत्ताबदल होऊन ५५ दिवस झाले तरी अजूनही भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षनेता निवडता आलेला नाही, मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे?
महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडून गद्दारांचे सरकार आल्यानंतर ४० दिवस या सरकारला मंत्रीमंडळ विस्तार करता आला नाही. शिंदे सरकारला एक वर्ष झाले तरी अजून राज्यातील सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री नेमता आले नाहीत, एका-एका मंत्र्यांकडे सहा-सहा जिल्ह्यांचा प्रभार आहे.
शिंदे गटाला महाराष्ट्र चालवता येत नाही आणि नरेंद्र मोदींना देश चालवता येत नाही हे जनतेने पुरते ओळखले आहे, त्यामुळे मनातल्या भितीमुळे केसरकरांचे शब्द बाहेर आले आहेत, असे लोंढे म्हणाले.