Tuesday, September 17, 2024
Homeराज्यघनदाट जंगलांचे घटणारे प्रमाण चिंताजनक – राहूल पांडे...

घनदाट जंगलांचे घटणारे प्रमाण चिंताजनक – राहूल पांडे…

अशोक काविटकर यांना ‘वनसंवर्धन’ पुरस्‍कार प्रदान

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर – जल, जमीन, जानवर या तीन महत्‍वाच्‍या घटकांचा समावेश असलेल्‍या सृष्‍टीशी नाते सांगणारी आपली संस्‍कृती आहे. या संस्‍कृतीचाच -हास होत चालला आहे. वाघ, हत्‍ती सारख्‍या प्राण्‍यांचे पालनपोषण करणा-या घनदाट जंगलांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असून ही बाब चिंताजनक आहे, असे मत माहिती आयुक्‍त राहूल पांडे यांनी व्‍यक्‍त केले.

वनराई फाउंडेशन आणि महाराष्‍ट्र राज्‍य वनरक्षक व पदोन्‍नत वनपाल संघटना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जागतिक वन दिनाचे औचित्‍य साधून स्‍व. उत्‍तमराव पाटील स्‍मृती वनसंवर्धन पुरस्‍कार वितरण सोहळ्याचे गुरुवारी आयोजन करण्‍यात आले. धनवटे सभागृहात पार पडलेल्‍या या कार्यक्रमात अमरावती येथे ऑक्‍सीजन पार्क निर्माते व माजी सहायक वनसंरक्षक अशोक वामनराव काविटकर यांना माहिती आयुक्‍त राहूल पांडे यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वनराई फाउंडेशनचे अध्‍यक्ष डॉ. ग‍िरीश गांधी होते तर मंचावर आदिवासी विकास आयुक्‍त रवींद्र ठाकरे, समन्‍वयक अजय पाटील, अनंतराव घारड, निलेश खांडेकर, बी. बी. पाटील, विशाल मंत्रीवार यांची उपस्‍थ‍िती होती.

तपस्‍या समजून नोकरी करीत समाजासाठी काम करणा-या अशोक काविटकर यांचे अभिनंदन करताना राहूल पांडे म्‍हणाले, प्रत्‍येकानेच जर असे प्रामाणिकपणे काम केले तर खूप मोठी देशसेवा ठरेल. उत्‍तमराव पाटील यांचा वारसा काविटकर पुढे चालवत असून इतरांनीही यातून प्रेरणा घ्‍यावी.

रवींद्र ठाकरे यांनी काविटकर यांच्‍या वनसंवर्धन, बंधारे, ऑक्‍सीजन पार्क आदी कार्याचे कौतुक करीत त्‍यांचे अभिनंदन केले. सत्‍काराला उत्‍तर देताना अशोक काविटकर यांनी पुरस्‍काराचे श्रेय त्‍यांचे सहकारी वनसंरक्षक व वनपाल यांना दिले. ज्‍या उत्‍तमराव पाटलांनी एमपीएससी परीक्षेदरम्‍यान मुलाखत घेतली होती त्‍यांच्‍या नावे पुरस्‍कार मिळत असल्‍याबद्दल त्‍यांनी आनंद व्‍यक्‍त केला व त्‍यांनी केलेल्‍या कार्याचे सादरीकरण केले.

प्रास्‍ताविक करताना अजय पाटील म्‍हणाले, माणूस जगलाच्‍या इतका जवळ गेला आहे की तेथील प्राणीही आता माणसाळले आहेत. त्‍यामुळे मनुष्‍य व प्राणी यांच्‍यातील संघर्ष वाढला आहे. हे टाळण्‍यासाठी 15 ते 20 किमी पर्यंत बफर झोन वाढवले गेले तर व्‍याघ्रसंवर्धन होऊ शकेल. याशिवाय, वनांच्‍या सुरक्षेसाठी असलेल्‍या कर्मचारी व अधिका-यांना निवडणुकीची जबाबदारी देऊ नये, अशी भावनाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन निलेश खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाला सतीश गडलिंगे, श्री मघदे, सचिन कोपकर, अनिल खाडोतकर, अतुल ढोके, आनंद तिडके, रमेश अदमाने, अमोल पिसे, पी. जे. कोरे, दीपक मगरे, अल्‍का तायडे, शुभंकर पाटील, अन‍िता मगरे, क‍िरण कोंबे, सपना नायर, सौरभ मगरे, बंटी मुल्‍ला, प्रवीण दहातोंडे, निखिल भोयर, तनुजा चौबे, पराग नागपुरे, भोयर साहेब आदींची उपस्‍थ‍िती होते.

नव्‍या पिढीच्‍या भविष्‍याची राखरांगोळी – डॉ. ग‍िरीश गांधी

पर्यावरणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून आपण अत्‍यंत बेजबाबदारीने वागत असून पर्यावरणाशी खेळ करत आहे. या मुळे येणा-या पिढीच्‍या भविष्‍याची राखरांगोळी आपण केली आहे, अशा भावना डॉ. ग‍िरीश गांधी यांनी व्‍यक्‍त केल्‍या. विपरीत परिस्थितीतही अशोक काविटकर व त्‍यांच्‍या सहकार्यांनी केलेले कार्य कौतुकास्‍पद असून प्रत्‍येकाने पर्यावरण संवर्धनाची आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे, असे ते म्‍हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: