सिंहगड : येरवडा मध्यवर्ती कारागृहात कारावास भोगत असलेल्या आरोपी तरुणांचा कारागृहात मृत्यू झाल्याची घटना शनिवार (31 डिसेंबर) घडली आहे. 2018 सालापासून हा तरुण कारागृहात बंदी होता. संदेश अनिल गोंडेकर (वय 26, मुळ. रा. डोणजे, ता. हवेली, सध्या रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे मृत आरोपीचे नाव असून कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे घडल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
कारागृह अधिक्षकांनी मात्र मृत आरोपीच्या कुटुंबियांचे सर्व आरोप फेटाळले.संदेश गोंडेकर याला 2018 साली हवेली पोलीसांनी खुनाच्या आरोपात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून संदेश येरवडा मध्यवर्ती कारागृहात होता.
त्याचे वडील अनिल गोंडेकर मोलमजुरी करतात तर आई कलावती गोंडेकर धुण्याभांड्याची कामे करते. 24 डिसेंबर ला संदेश च वडीलांशी शेवटचे बोलणे झाले होते.
त्यानंतर शनिवार 31 डिसेंबरला संदेशचे आई- वडील नियमितप्रमाणे त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले होते. मात्र सकाळी साडेआठ वाजता भेटण्यासाठी नंबर लावून देखील दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांचा नंबर आला नाही. मात्र अचानक दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना हवेली पोलीस ठाण्यातून संदेशचा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला असल्याचे फोनवरून सांगण्यात आले. मुलालाची तब्बेत सातत्याने खालावत होती. तो वारंवार मला त्रास होत आहे हॉस्पिटलमध्ये घेऊन जा मात्र वारंवार सांगूनही प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप आईवडील करत आहेत.संदेश व्यतिरिक्त आणखी तीन आरोपींचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
‘आम्ही सकाळपासून मुलाला भेटण्यासाठी थांबून होतो. तो गंभीर आजारी आहे किंवा दवाखान्यात दाखल आहे याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. अचानक दुपारी फोन करुन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सर्व घटना संशयास्पद असून या प्रकरणाची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा.’
-अनिल गोंडेकर, वडील. –
‘मोठा मुलगा दहावीत असताना हृदय विकाराने गेला. हा एकच आमच्या जगण्याचा आधार होता. मागील काही दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती. जेवण चांगले मिळत नाही असे तो सांगायचा. त्याला नीट उपचार मिळाले असते तर तो जगला असता. आमचा एकुलता एक आधार गेला इतरांच्या बाबतीत तरी असे घडू नये.’
- कलावती गोंडेकर, आई.
‘एकाच दिवशी तीन जणांचा जेलमध्ये मृत्यू होतो ही गंभीर बाब आहे. आरोपीला कधी दवाखान्यात दाखल केले होते, नेमके काय झाले होते, अगोदर कुटुंबियांना कळविले का नाही, याबाबत जेल अधिकारी उत्तर देत नाहीत. घडलेल्या घटनेबाबत जेल प्रशासनाची चौकशी होणे आवश्यक आहे. ‘
- योगेश भामे, ग्रामपंचायत सदस्य, डोणजे.
‘आरोपीला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना हवेली पोलीस ठाण्याच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती. कारागृहातील आहार चांगला आहे. इतर तपशीलवार माहिती सध्या सांगू शकत नाही.’
- शिवशंकर पाटील, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह.