Sunday, December 22, 2024
Homeराज्यमालमत्ता कर भरण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

मालमत्ता कर भरण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ…

३१ ऑगस्‍ट पर्यंत मालमत्ता कर भरा, १० टक्के सूट मिळवा; अमरावती महापालिकेचं नागरिकांना आवाहन

अमरावती – सुनील भोळे

मालमत्ता कर भरण्यासनागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ जुलैपर्यंत सवलतीमध्ये कर भरण्याची मुदत होती. मात्र अजूनही बरेच मालमत्ता धारकांनी कर भरलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सवलतीच्या दरात मालमत्ता कर भरण्यासाठी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. महापालिका क्षेत्रात ३ लाखांवर मालमत्तांची सर्वेक्षणाच्या अंती नोंद झाली आहे; या मालमत्ताधारकांकडून जवळपास १४० कोटी रुपयांपर्यंतचे महसूल जमा होणार आहे.

गेल्या वेळी दिलेल्या मुदतवाढीनुसार ३१ जुलैपर्यंत थकीत कराचा संपूर्ण भरणा केल्यास शास्ती अभय योजनेंतर्गत १० टक्के सूट तर ऑनलाइन भरणा करण्यावर ३ टक्के अतिरिक्त सूट देखील देण्यात आली आहे. परंतु तरीही अनेक मालमत्ताधारकांकडून भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे सवलतीच्या योजनेनुसार ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शहरातील मालमत्ताधारकांनी ३१ ऑगस्टपूर्वी मालमत्ता कर भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केले आहे.

अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता धारकांच्या मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याकरिता महानगरपालिकेची वेबसाईट www.amravaticorporation.in तथा www.amravatimc.in व amravatimc.org या संकेतस्थळावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मालमत्ता धारकांना कर भरण्याबाबत थकित कर(असल्यास)विलंब शुल्क शास्ती पूर्णतः १००% माफ करण्यात आला असून चालू कराचा भरणावर देखील सामान्य करात तब्बल १०% सूट महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे. यासोबतच ऑनलाइन कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना ३ % व महिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेस ५ % अतिरिक्त कराची सवलत देण्यात आली आहे तसेच सौर ऊर्जा प्रकल्प(सोलर) व रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

सर्व मालमत्ता धारकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, वरील संकेतस्थळावर आपल्या मालमत्तेचा नवीन क्रमांक व नावानुसार कराचा भरणा ३१/०८/२०२४ पुर्वी करुन भरघोस सुटीचा लाभ घ्यावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे. महानगरपालिकेतर्फे वैयक्तिक लिंक असलेले नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मालमत्ता निहाय एसएमएस पाठविण्यात आले असून त्यावरून देखील आपण मालमत्तेचे बिल डाऊनलोड करून कराचा भरणा करू शकता. अमरावतीकरांनी या सवलतीचा जास्तीत जास्त फायदा घेवून आपला मालमत्ता कर प्राधान्याने भरावा. मागीलवर्षी देखील नागरिकांनी कर भरणा करून सहकार्य केले आहे, तसेच यावर्षी देखील सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: