पातूर – निशांत गवई
अनुसूचित जाती व नवबाैद्ध वस्तीचा विकास करणे, या याेजनेअंतर्गत काम पूर्ण करण्यात अाले नसून, निधी खर्च न करता परत करण्यात आला, असा आराेप करीत पातूर चरणगाव येथील सरपंच, ग्रामस्थांनी साेमवारी ठिय्या दिला. हे आंदाेलन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कार्यालयाबाहेरच करण्यात आले. अखेर याप्रकरणी चाैकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. तसा आदेशतच सीईओंनी जारी केला. त्यानंतर आंदाेलन स्थगित करण्यात आले.
अनुसूचित जाती व नवबाैद्ध वस्तीचा विकास करणे, या याेजनेअंतर्गत कामांचे नियाेजन, मंजुरी समाज कल्याण समितीच्या सभेत देण्यात येतेे. रस्ते, सभागृह, नालीची कामे प्रस्तावित करण्यात येतात. कामांसाठी जिल्हा परिषद सदस्यांकडून कामांची शिफारस करण्यात येते. दरम्यान चरणगावसाठी सन २०२२-२३ मदील निधीमधून रमाई नगर या वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली कामासाठी १३ लाख मंजूर करण्यात आले.
या कामांचा ५० टक्के निधी पंचायत समितीस्तरावर पाठवण्यात आला. निधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत हाेती. मात्र काम पूर्ण झाले नाही व खर्च न करता निधी परत करण्यात आला, असे आंदाेलनकर्त्यांचे म्हणणे हाेते. आंदाेलनात सरपंच मेघा प्रमोद देशमुख यांच्यासह रेखा देशमुख, इंदिरा वावगे, रंजना देशमुख, उज्वला बघे, यशोदा बघे, संध्या गाडेकर, विद्या देशमुख, अस्मिता इंगळे, संतोष इंगळे, अमोल सरदार, उत्तम इंगळे, धीरज इंगळे आदी सहभागी झाले.
हे आहेत समितीमध्ये
चरणगाव येथील निधीबाबत चाैकशीसाठी दाेन सदस्यीय चाैकशी समिती गठित करण्यात आली आहे. यात अकाेटचे सहाय्यक गट विकास अधिकारी आर. एस.खुमकर व विस्तार अधिकारी (पंचायत) जे.टी. नागे यांचा समावेश आहे.
दाेषींवर गुन्हा दाखल करा – सरपंच
चरणगाव ग्रामपंचायत येथे शासनाकडून दलित वस्ती च्या कामासाठी १३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता; परंतु याबाबत सचिव व गटविकास अधिकारी यांनी मला माहिती दिली नाही. ५० टक्के टक्के निधी पंचायत समितीला प्राप्त झाला होता काम न करता तो निधी परत शासनाला पाठवला. त्यामुळे दलित वस्तीतील कामे होऊ शकले नाहीत. हा नागरिकावर एक प्रकारे अन्याय आहे. दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात याव. – मेघा प्रमोद देशमुख, सरपंच, चरणगाव.
कुरघाेडीच्या राजकारणाचा फटका
चरणगाव परिसरात वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये सुरु असलेल्या कुरघाेडीच्या राजकारणाचा फटका विकास कामांना बसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जि.प.सर्कल वंतितच्या ताब्यात असून, ग्रा.प.वर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मुद्दावरुन घमासान हाेण्याची शक्यता आहे.
त्यामुळे निधी गेला परत
कामाची ऑडर १९ सप्टेंबर राेजी जाेरी करण्यात आली. निधी परत गेल्यामुळे कामाला कंत्राट दराने सुरवात केली नाही, असे ग्रामसेवक पंजाब चव्हाण यांचे म्हणणे आहे.