Monday, December 23, 2024
Homeमनोरंजन१३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'डाक' अश्विनी काळसेकर प्रमुख भूमिकेत…

१३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘डाक’ अश्विनी काळसेकर प्रमुख भूमिकेत…

मुंबई – गणेश तळेकर

‘डाक’ या भयपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून १३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर मराठीसह हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी काळसेकर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

महेश नेने प्रोडक्शनच्या बॅनरखाली रतिश तावडे आणि महेश नेने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून देवांग गांधी यांचे ‘डाक’ चित्रपटाला विशेष सहकार्य लाभलं आहे. निर्मितीसोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शनही महेश नेने यांनीच केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी वितरणाच्या माध्यमातून हा चित्रपट सर्वदूर पोहोचवण्याची मोलाची कामगिरी स्वीकारली आहे.

या चित्रपटात प्रवाहापेक्षा खूप वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. आजच्या प्रगत काळातही समाजाच्या एका कोनाड्यात रूढी-परंपरांना चिकटून बसलेली विचारसरणी पाहायला मिळते. त्याचं दर्शन वेळोवेळी आपल्याला घडतही असतं. अशाच एका प्रथेवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट विविध विषयांना स्पर्श करणारा आहे.

आपल्या देशात अनेक प्रथा होत्या. कायद्याने मान्यता नसूनही त्या पाळल्या जात होत्या. प्रवाहाच्या ओघात आणि शिक्षणाच्या प्रभावामुळे काही प्रथा बंद झाल्या असल्या तरी काही प्रथा आजही काही ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्यापैकी ‘डाक’ या प्रथेवर हा चित्रपट भाष्य करणारा आहे.

माणसाच्या निधनानंतर बाराव्या दिवशी डाक घालून मृत व्यक्तीच्या आत्म्याला बोलावून तो अचानक गेल्याचं कारण विचारलं जाई. याच विषयावर आधारलेली एक थ्रिलर, मर्डर मिस्ट्री म्हणजेच ‘डाक’ हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच कथालेखनही महेश नेने यांनीच केलं आहे. अश्विनीच्या जोडीला या चित्रपटात संजीवनी जाधव, अनिकेत केळकर आदी कलाकार दिसणार आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: