Friday, January 10, 2025
Homeराज्यदादासाहेब काळमेघ भविष्याचा वेध घेणारे द्रष्टे व्यक्तीमत्व, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांचे...

दादासाहेब काळमेघ भविष्याचा वेध घेणारे द्रष्टे व्यक्तीमत्व, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांचे गौरवोद्गार…

स्व. दादासाहेब काळमेघ यांचा सत्ताविसावा पुण्यस्मरण सोहळा

अमरावती – दुर्वास रोकडे

अनेकांचे जीवन प्रकाशमान करणाारे स्व. दादासाहेब काळमेघ दीपस्तंभ आणि आधारस्तंभासारखे आहेत. ४० वर्षांपूर्वीच नव्या शैक्षणिक धोरणाची मुहुर्तमेढ रोवणारे दादासाहेब हे भविष्याचा वेध घेणारे द्रष्टे व्यक्तीमत्व होते असे गौरवोद्गार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी काढले. नागपूर रोडवरील गुरूदेव प्रार्थना मंदिर येथे आयोजित स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या सत्ताविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संत अच्युत महाराज यांचे परमशिष्य सचिन देव महाराज, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांची उपस्थिती होती.

यावेळी मंचावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजाननराव पुंडकर, भैय्यासाहेब पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष किर्ती अर्जून, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य तथा स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, सुरेश खोटरे, सुभाष बनसोड, स्वीकृत सदस्य तथा डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष नरेश पाटील, उपाध्यक्ष प्रशांत डवरे, संस्थेचे सचिव डॉ. वि.गो.ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. मिलिंद बारहाते यांनी सांगितले की, दादासाहेबांनी पारंपारिक शिक्षणाची दिशा बदलण्यासाठी अनेक क्रांतीकारी पावले उचलली होती. एक तेजस्वी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची कारकीर्द अजरामर झाली आहे. त्यांच्या विचारांवर आज विद्यापीठांमध्ये आमच्यासारखे अनेक जण काम करत असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला. यावेळी सचिन देव महाराज यांनी आपल्या प्रवचनरूपी वक्तव्यातून स्व. दादासाहेब काळमेघ यांच्यासारखा सच्चा सुपूत्र तथा महापुरूष आपल्या सर्वांच्या जीवनात येऊन गेला यासाठी आपण भाग्यवान असल्याचे सांगितले. दादासाहेब एक पुण्यवान पुरूष होते.

दादासाहेब काळमेघ यांच्या कार्याचा वैचारिक वसा खऱ्या अर्थाने आज हेमंतराव आणि शरदराव काळमेघ पुढे नेत आहेत ही त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना प्र – कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी स्व. दादासाहेबांनीच अनेकांचे जीवन घडविले त्यातीलच मी देखील एक लाभार्थी असल्याचा उल्लेख केला. दादासाहेबांमुळे एक पिढी तयार झाली असून त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी देखील स्वत:ला भाग्यवान समजतो असे उद्गार काढले.

अध्यक्षीय भाषणातून दिलीपबाबू इंगोले यांनी दादासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. दादासाहेबांच्या जीवनातील प्रसंगांची आठवण त्यांनी करून दिली. या कार्यक्रमाचा मी गेल्या २७ वर्षांपासूनचा साक्षीदार असून मी सदैव हेमंत काळमेघ यांच्या पाठिशी उभा असून पुढे देखील मी हेमंत काळमेघ यांच्यासोबतच राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात प्रा. अनिल काळे यांच्या संगीतीय चमुने दादासाहेब काळमेघ यांच्यावरील गीताने झाली.

प्रास्ताविकातून हेमंत काळमेघ यांनी स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्या स्थापनेपासूनची वाटचाल विशद करत आज स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रूग्णालयाला नॅककडून ए प्लसचा दर्जा मिळाला त्यामुळे खऱ्या अर्थाने दादासाहेबांच्या स्वनाला आकार देण्यात आम्ही काही अंशी यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मंदा नांदूरकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र तायडे यांनी केले. या कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व आजीवन सभासद, शिवपरिवारातील सर्व कर्मचारीवृंद तसेच दादासाहेब काळमेघ यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो मान्यवरांची उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: