मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम
नागपूर विभागातून थुंगाव (निपाणी) शाळा ‘प्रथम’
नरखेड – अतुल दंढारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतंर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात नागपूर विभागात नरखेड तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा, थुगांव (निपाणी) यांनी ‘प्रथम’ स्थान प्राप्त केले.
नुकतेच महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री ना.श्री.दिपकजी केसरकर यांचे शुभहस्ते 21 लक्ष रुपये धनादेश सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून मुंबई येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रधान सचिव रणजित देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, शिक्षण संचालक शरद गोसावी प्रामुख्याने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पकडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद चौधरी, थुगांव (निपाणी) ग्रामपंचायत सदस्य कांतेश्वर चौधरी,विद्यार्थी पार्थ हिवसे,आर्या दिग्रसकर व उमंग आखरे यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारला.
थुगांव (निपाणी) शाळेत विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व घडविण्याकरिता पुस्तकाबाहेरील ‘माणूस’ बनविणारे शिक्षण दिले जाते. उन्नती बचत बँक, ग्रेट भेट – एक मुलाखत, परसबाग, फूड फेस्टिव्हल, भविष्यवेधी शिक्षण पद्धती, आकाशकंदील व पणती विक्री उपक्रम,बाल संस्कार शिबिर, राज्य विज्ञान नाटयोत्सव, हॅकेथॉन कोडिंग स्पर्धा इत्यादी विविध उपक्रमातून चार भिंतीबाहेरील शिक्षण विद्यार्थी घेत आहे.
थुगांव (निपाणी) शाळेच्या यशाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, शिक्षणाधिकारी (प्राथ) रोहिणी कुंभार, सहा. कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे, गटविकास अधिकारी डॉ. निलेश वानखेडे, वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे, वेधचे सचिव खुशाल कापसे आदींनी अभिनंदन केले आहे.