आकोट – संजय आठवले
बेलापूर नवी मुंबई पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिडको कार्यालयामध्ये कंत्राटी कामगारांना वेतन देण्याचे नावे तब्बल २ कोटी ८१ लक्ष ९३ हजार ४३४ रुपयांचा घोटाळा करण्यात आला असून सिडको महाव्यवस्थापकांनी या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार म्हणून तेल्हारा येथील सागर मदनलाल तापडिया याचे विरोधात पोलीस फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस तपासादरम्यान चौकशीकरिता बोलाविण्यात आलेल्या तेल्हारा येथील अन्य आरोपींनी प्रवासात अटक न होणेकरिता आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात केलेला तात्पुरता प्रवासी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला असून अशाच दुसऱ्या अर्जाची पुढील सुनावणी ५ जून रोजी होणार आहे.
या प्रकरणाची माहिती अशी आहे कि, तेल्हारा येथील सागर मदनलाल तापडिया हा सहाय्यक कार्मिक अधिकारी (आस्थापना) म्हणून सिडकोमध्ये कार्यरत होता. त्यादरम्यान सन २०१७ पासून आतापर्यंत कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दर्शवून त्या लोकांचे नावे सिडकोच्या लेखा विभागातून वेतन अदा करण्यात आल्याचे उघडकीस आले.
त्याची पडताळणी केली असता तब्बल २८ व्यक्तींच्या नावे खोटी नियुक्तीपत्रे तयार केल्याचे तथा त्यावर स्कॅन केलेल्या स्वाक्षरीचा वापर केल्याचे आढळून आले. या बनावट कंत्राटी कामगारांचे हजेरीपटही तयार करण्यात आले. अर्थात तेही बनावटच होते. ही सारी कागदपत्रे सिडको कार्यालयास सादर करून ह्या २८ बनावट कंत्राटी कामगारांचे नावे सागर तापडिया याने तब्बल २ कोटी ८१ लक्ष ९३ हजार ४३४ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून सिडकोचे कार्मिक व्यवस्थापक फैयाज अहमद अब्दुल हमीद खान यांनी पोलीस स्टेशन सीबीडी बेलापूर जिल्हा ठाणे येथे तक्रार नोंदविली. त्यावर सागर तापडिया याचे विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार जगताप यांचे तपासामध्ये या प्रकरणात अनेकांचा सहभाग असल्याचे दिसून आले. या घोटाळ्याचे धागेदोरे मुंबईहून थेट तेल्हाराशी जुळले. निर्मल उज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तेल्हारा चे शाखा व्यवस्थापक नंदकिशोर गुंजाळे यांचेही नाव या प्रकरणात आले.
सागर तापडियाने दर्शविलेल्या बनावट कंत्राटी कामगारांची काही बँक खाती गुंजाळे यांनी आपल्या को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काढलीत. सोबतच त्या खात्यात सिडकोकडून आलेली रक्कमही काढली असल्याचा त्यांचेवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्याकरिता त्यांना अटकही करण्यात आली आहे. या साऱ्या अपहार प्रकरणात गुंजाळेंसह आणखी ६ कर्मचारी गुंतलेले आहेत.
त्या सोबतच मंगलमूर्ती अर्बन निधी तालुका तेल्हारा या पतसंस्थेचे चेअरमन मनीष कुमार दिनेशचंद्र गुप्ता रा. दहिगाव तालुका तेल्हारा यांनीही आपल्या पतसंस्थेत सागर तापडियाच्या बनावट कंत्राटी कामगारांची बँक खाती काढल्याचा आणि त्यात आलेली रक्कमही काढल्याचा पोलिसांचा आक्षेप आहे.
त्याकरिता सीबीडी पोलीस ठाणेदार यांनी निर्मल उज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तेल्हाराचे ६ कर्मचारी तथा मंगलमूर्ती अर्बन निधी तालुका तेल्हाराचे चेअरमन मनीष कुमार दिनेशचंद्र गुप्ता यांना तपासाकरिता नवी मुंबई येथे हजर राहण्यास फर्माविले आहे.
परंतु या नोटीस नुसार तपासाकरिता तेल्हारा येथून नवी मुंबई येथे जात असता प्रवासादरम्यान अटक होण्याची भीती या लोकांना सत्तावीत आहे. प्रवास आणि तपास अशा कालावधीत आपणास पोलिसांनी अटक करू नये म्हणून या लोकांनी आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात तात्पुरता प्रवासी अटकपूर्व जामीन मिळणेकरिता अर्ज दाखल केला आहे.
याप्रकरणी सरकारी वकील अजित देशमुख यांनी पोलीस स्टेशन सीबीडी बेलापूरची बाजू मांडली. त्यांचे युक्तिवादानंतर निर्मल उज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सहकारी संस्था तेल्हाराचे ६ ही कर्मचाऱ्यांनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे.
परंतु मंगलमूर्ती अर्बन निधी तेल्हाराचे चेअरमन मनीष कुमार दिनेशचंद्र गुप्ता यांनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज कायम ठेवला आहे. त्यावर सरकारी वकील अजित देशमुख यांनी विरोध केल्याने याप्रकरणी पुढील सुनावणी ५ जून २०२३ रोजी ठेवण्यात आली आहे.