राजु कापसे
रामटेक
शहरातील राधाकृष्णन वॉर्डातील रहिवासी धनराज वाघुळकर यांच्या घराला लागून असलेल्या गोठ्याला बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास आग लागली. त्यात बांधलेल्या पाच जनावरांपैकी एक गाय जळून खाक झाली. वेळीच जनावरांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचू शकले. या आगीत छतावरील टिन, जनावरांचे खाद्य, कडबा, कुटार, लाकडी पाटे, ताना आदी साहित्य आगीत जळून खाक झाले. आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
वाइल्ड लाईफ चॅलेंजर ग्रुपचे अध्यक्ष राहुल कोठेकर, रजत मेश्राम यांनी तातडीने नगर परिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर न प अग्निशमन दलाचे कर्मचारी गोविंदा तुपट यांच्यासह वाहन घटनास्थळी पोहोचले. जिथे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे कारण कळू शकलेले नाही.
पोलिस सहायक निरीक्षक संजय खोब्रागडे, नाईक मनोहर राऊत, विद्युत विभागाचे पप्पू शिकलगीर यांनीही परिस्थिती हाताळली. राहुल कोठेकर, रजत मेश्राम, चेतन चोपकर, पुरुषोत्तम चोपकर, गजानन चोपकर यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली. पटवारी ठाकूर घटनास्थळी येऊन पंचनामा केला. गरीब शेतकरी धनराज वाघुळकर यांना शासकीय मदतीची मागणी वार्डवासीयांनी केली आहे.