अकोला – अमोल साबळे
गेल्या चार दिवसात कापसाच्या दरात सुधारणा होत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्चच्या अखेरच्या तुलनेत एप्रिलच्या सध्याच्या तारखेत आतापर्यत ४१५ रुपयांनी कापसाच्या दरात वाढ झाली. शनिवारी कापसाच्या दरात १८५ रुपयांनी वाढ झाली आहे. कृषी बाजारात कापूस खरेदीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याच्या कापसाला ८ हजार ८४० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल मागे भाव मिळाला.
विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात कापसाच्या दरात घसरण झाली होती. २९ मार्च रोजी सुधारणा होऊन कापसाला ७ हजार ८०० पासून ८ हजार ४२५ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे भाव होता. त्यानंतर सातत्याने कापसाचे भाव वाढत गेले. ३ एप्रिलला कापसाच्या दरात १८५ रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे कापसाला ८ पासून ८ हजार ६०५ रुपयांपर्यंत भाव आला होता.
पाच एप्रिलला पुन्हा कापसाच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ झाली. अन् कमीत कमी ८ हजार ते जास्तीत जास्त ८ हजार ६५५ रुपये प्रतिक्विंटल मागे कापसाचे दर पोहचले. त्यानंतर कापसाच्या दरात त्याची कायम राहिली आणि आज शनिवारी देखील कापसाच्या दरात १८५ रुपयांनी वाढ झाली आहे. अकोट तालुक्यातील लोहारी गावातील किशोर अरूण गावंडे या शेतकऱ्याच्या शेतमालाला (कापसाला) ८ हजार ८४० रूपये इतका प्रतिक्विंटल मागे भाव मिळाला.
दरम्यान सद्यस्थितीत कापसाच्या संदर्भात अपडेट पाहता कापूस दरवाढीचा ट्रेंड कायम आहे. लवकरच कापसाच्या दराचा टप्पा ९ हजारांचा टप्पा ओलांडू शकतो, अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे दरवाढीचा या शेतकऱ्यांना होईल फायदा कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यात मार्च एंडिंग मुळे शेतकऱ्यांना इच्छा “नसतानाही मिळेल ‘त्या’ दराने आपला कापूस विकावा लागलाय. त्यामुळे आता खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांकडे कापूस उरला आहे.
सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवलेला आहे, त्यांच्या मालाला आता कुठेतरी चांगले दर मिळू शकतील, कारण कापसाचे दरासंदर्भात तेजी पाहता, कापूस स्टॉक करून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदा ठरू शकणार, असे समजते. परंतु तरीही कापसाची आवक वाढल्यास कापसाच्या दरात चढ-उतार होऊ शकतात असेही कळते.”