पातूर – निशांत गवई
आलेगाव वनपरिक्षेत्रातील रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर तीन नागरिकांनी उपोषण प्रारंभ करताच मुख्य वनसंरक्षकांचे पथक शनिवारी ऑन द स्पॉट पोहोचले. या पथकाकडून तपासणी व चौकशी करण्यात आली.
जिल्ह्यातील पातुर तालुक्यात येणाऱ्या आलेगाव वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपूर्वी पांढुर्णा ते सोनुना रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मंगेश इंगळे रा. दिग्रस खुर्द, निलेश सोनोने, पंजाबराव देवकते रा, पांढुर्णा यांनी मुख्य वन संरक्षक यांच्याकडे केली होती. तक्रारीवर कारवाई झाली नाही म्हणून त्यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण प्रारंभ केले होते.
हे उपोषण प्रारंभ होताच मुख्य वनसंरक्षकांचे पथक ऑन द स्पॉट पोहोचले व शनिवारी या पथकाने या रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत प्रत्यक्ष पाहणी व तपासणी केली. वनविभागाचे मुख्य अभियंता डोणगावकर यांच्या मार्गदर्शनात या पथकाने पाहणी व तपासणी केली.
आता या पाहणी व तपासणीचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अहवालानंतर कुणावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान उपोषण प्रारंभ होताच मुख्य वनसंरक्षकांचे पथक ऑन द स्पॉट पोहोचल्याने या प्रकरणातील दोषींचे धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे.