अमरावती – दुर्वास रोकडे
महिला, पुरुष व बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन अचलपूर येथे रविवार , दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे. शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या, उपचार व समुपदेशन केले जाणार आहे. महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा व डॉक्टर मेडीकल ग्रुपने समन्वयाने नियोजन करा, अशी सूचना आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केली आहे.
महाआरोग्य शिबिराची पुर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आज आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौदंळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपविभागीय अधिकारी अचलपूर बळवंत अरखराव, उपविभागीय अधिकारी दर्यापूर राजेश्वर हांडे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
महाआरोग्य शिबिरामध्ये बालरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग कर्करोग, मूत्रपिंड आजार, लघवी संबंधित आजार, रक्त चाचणी अशा विविध रोगाची तपासण्या व समुपदेशन करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान संशयित रुग्णांना शस्त्रक्रिया व पुढील उपचाराकरिता मुंबई किंवा आवश्यकतेनुसार आरोग्य सुविधा असलेल्या अन्य ठिकाणी उपचाराकरिता पाठविण्यात येणार आहे.
या शिबिरामुळे सामान्य रुग्णालय, तालुका व ग्रामीण रुग्णालयावर येणारा ताण कमी होणार असून एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. महाआरोग्य शिबिरामध्ये मोठया संख्येने रुग्ण येणार असल्याने शिबिराच्या ठिकाणी रुग्णांना पाणी, स्वच्छता, वाहतूक सेवा इत्यादी अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध होईल , यासाठी स्थानिक प्रशासनाने पूर्वतयारी करावी. महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणेनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.