Saturday, December 21, 2024
Homeराज्यखुनाचा हेतू नसताना झालेल्या खून प्रकरणात दोष सिद्ध….आकोट न्यायालयाने निकाल राखून ठेवला….६...

खुनाचा हेतू नसताना झालेल्या खून प्रकरणात दोष सिद्ध….आकोट न्यायालयाने निकाल राखून ठेवला….६ मे रोजी होणार निकाल वाचन…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरातील खानापूर वेस परिसरात क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या भांडणात खुनाचा हेतू नसताना झालेल्या खून प्रकरणात आरोपीवरील गुन्हा शाबित झाला असून यासंदर्भात आकोट न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

याप्रकरणी करण्यात येणाऱ्या शिक्षेचे वाचन दि. ६ मे रोजी करण्यात येणार आहे. हा सारा प्रकार केवळ दारूमुळे झाला असून त्यामुळे एक तरुण जीवास मुकला तर मारेकरी मोठ्या शिक्षेस पात्र ठरला अशी परिसरात चर्चा आहे.

या घटनेची हकिगत अशी कि, खानापूर वेस परिसरात धनराज तेलगोटे यांचा पानठेला होता. त्यासमोरील सार्वजनिक जागी तरुण मुले गप्पा मारीत उभे राहायचे. दि.२७.१०.२०२१ रोजी दुपारी १.३० वा. या ठिकाणी विकी उर्फ सतीश विलास तेलगोटे वय २३ वर्षे हा आला.

आल्यानंतर तो तिथे पाणी प्यायला. आणि तोंडातील पाण्याची गुळणी त्याने तेथे आधीच उपस्थित असलेल्या सफल शिलानंद तेलगोटे याचे अंगावर टाकली. नंतर त्याला शिवीगाळ करुन त्याची मानगुट पकडली.

ते पाहून तिथेच उपस्थित असलेला सफलचा मित्र रोहित मोरे ह्याने विकीचा हात झटकून त्याला पुढील प्रकार करण्यापासून रोखले. आपल्याला अटकाव केल्याने विकीचा राग अनावर झाला. आणि रागाच्या भरात आपल्या जवळ असलेले भाल्याचे पाते त्याने रोहित मोरे ह्याचे डाव्या बाजूकडील छाती खालील बरगडीत भोसकले. हा घाव वर्मावर लागल्याने आणि गंभीर व खोल असल्याने ह्या एका घावानेच रोहितची प्राणज्योत मालवली.

त्यावर एकच हलकल्लोळ झाला. ही खबर रोहितचे पिता देवेंद्र नारायण मोरे वय ४६ वर्षे यांना कळताच त्यांनी आकोट शहर पोलीस ठाण्यात प्रकरणाची कैफियत दिली. त्यावर आकोट पोलिसांनी भादवि कलम ३०२ अन्वये अपराध नोंदविला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धीरज चव्हाण यांनी तपास केला.

या तपासा दरम्यान या प्रकरणात सफल शिलानंद तेलगोटे, राजकुमार देवकीनंदन तेलगोटे, योगेश मनोहर तेलगोटे ह्या युवकांनी भादवि कलम १६४ अन्वये न्यायाधीशांसमोर आपला जबाब नोंदविला.

त्यानंतर प्रकरण आकोट न्यायालयात पेश करण्यात आले. नियमानुसार ह्या प्रकरणी जाबजबाब, साक्षीदार तपासणी, उभयपक्षी वकिलांचे युक्तिवाद झाल्यानंतर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपीवर अपराध सिद्ध होत असल्याचा निवाडा दिला.

परंतु या प्रकरणातील वैशिष्ट्य हे आहे कि, न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी उद्भवलेला प्रसंग, त्यातील मारेकऱ्याची मानसिकता, त्याने केलेले वर्तन, त्या वर्तनाचा झालेला परिणाम याचे सूक्ष्म परीक्षण केले आणि हा अपराध भादवी कलम ३०२ अन्वये नोंदविलेला असला तरी या प्रकरणातील तथ्यांच्या आधारे भादवी ३०२ हे कलम वगळून ते भादवी ३०४ मध्ये परिवर्तित केले.

त्यामुळे ह्या प्रकरणात हत्या झाली परंतु ती हत्या करण्याचा मारेकऱ्याचा मानस नव्हता असा निष्कर्ष निघाला आहे. या निष्कर्षानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. त्याचे वाचन दिनांक ६ मे २०२४ रोजी करण्यात येणार आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्रीमती प्रार्थना सहारे यांनी जबर युक्तिवाद केला.

या कामी त्यांना ज्येष्ठ सरकारी वकील जी. एल. इंगोले तथा अजित देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले. न्यायालय पैरवी म्हणून एस. सी. प्रकाश जोशी यांनी काम पाहिले. याप्रकरणी लागणाऱ्या निकालाकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: