राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात, काही महिन्यापूर्वी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आज पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यावर कॉंग्रेसने ट्वीट करून चांगलाच समाचार घेतला आहे. “माननीय राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही करत सुटलेत. काळ जुना असो किंवा नवा छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी नेहमीच आदर्श असतील. तुमचे आदर्श तुम्हाला लख लाभो, डोक्यावर घेऊन नाचा त्यांना !” असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं. त्यांच्या या विधानावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले राज्यपाल?
आपल्या भाषणात राज्यपालांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केलं. “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.