भारतात विविध जाती धर्माचे लोक मोठ्या गुण्यागोविंदाने राहतात, मात्र छत्तीसगडमधून सोशल मिडीयावर आलेल्या या व्हिडीओमुळे अनेकांना वाईटही वाटत आहे. बेमेटारा येथे दोन समुदायांमधील वादाचे प्रकरण तापले असून हिंसाचार थांबायचं नाव घेत नाही. त्याचवेळी जगदलपूरमधील विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या नेत्यांनी विशिष्ट समुदायाशी व्यापार न करण्याची शपथ घेतली आहे. या शपथेनुसार आता हे नेते ख्रिश्चन आणि मुस्लिमांशी कोणत्याही प्रकारे व्यावसायिक व्यवहार करणार नाहीत. यासोबतच व्यापारी प्रतिष्ठानांवर धार्मिक चिन्हे लावण्यात येणार आहेत. नेत्यांचा शपथविधी करतानाचा हा व्हिडिओ सोमवारी सायंकाळी उशिरा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजपचे माजी खासदार दिनेश कश्यप, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय पांडे, बस्तर संस्थानचे महाराज कमलचंद्र भांजदेव यांच्यासह अनेक नेते दिसत आहेत. यामध्ये पूर्णपणे अहिंदू, मग तो मुस्लिम असो वा ख्रिश्चन, कोणताही व्यावसायिक व्यवहार करणार नाही, अशी शपथ घेतली जात आहे. दूध, फळे, भाजीपाला, पुठ्ठा, किराणा किंवा कोणतीही वस्तू मी त्यांच्याकडून खरेदी करणार नाही. मी त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ घेतो.
त्याचवेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अशा शपथेबद्दल स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जगदलपूर शहरावर असा प्रभाव कधीच पडला नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. याशिवाय अशा कृत्यामुळे मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील लोकांमध्येही नाराजी दिसून येत आहे. सध्या निवडणुकीच्या काळात असे अनेक चित्र समोर येत आहेत. जनता आता काय निवडते, हे येणारा काळच सांगेल.