सांगली – ज्योती मोरे
कामगारांना वाटप करण्यात आलेले सुरक्षा किट हे कामगारांच्या जीवनाला संरक्षण देणारे कवच आहे. यासाठी काम करताना सुरक्षा किट वापरण्याची कामगारांनी दक्षता घ्यावी. महाराष्ट्रात 73 हजार किट कामगारांना वाटप करणार असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.
मिरज येथे नोंदित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक वस्तू संच वाटप मेळाव्यात ते बोलत होते. बालगंधर्व नाट्य मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर संगीता खोत, सहायक आयुक्त कामगार कल्याण एम. ए. मुजावर आदि उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यात सेतू केंद्र करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे कामगारांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणीच नोंदणी करता येणार आहे. संघटित व असंघटित कामगारांना एक वर्षाऐवजी पाच वर्षासाठी कार्ड देवून त्यांना न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या व अन्य मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांना अर्थ सहाय्य वितरित करण्यात आले. यामध्ये नैसर्गिक मृत्यू झालेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या वारसास, वैद्यकीय व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या पाल्याना अर्थ सहाय्य,
विवाह खर्चाची प्रतिपूर्ती, शैक्षणिक सामुग्रीसाठी, तसेच कामगाराच्या पत्नीच्या प्रसूतीसाठी अर्थसहाय्य यांचा समावेश आहे. तसेच अटल बांधकाम कामगारांसाठी आवास योजना अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची प्रतिकृती देण्यात आली.