आकोट – संजय आठवले
बिअर बार सुरू करण्याकरिता अर्जदारास लक्षावधी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क आकोट कार्यालयाचा दुय्यम निरीक्षक तथा राज्य उत्पादन शुल्क अकोला कार्यालयाचा शिपाई या दोघांना अकोला लाच प्रतिबंधक विभागाने अटक केली असून त्यांचेवर नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेची हकीगत अशी कि, तक्रारदारास त्याचे जमिनीवर राज दरबार बियरबार सुरू करावयाचा होता. त्याकरिता तक्रारदाराचे वडिलांनी सन २०१४ मध्ये राज्य उत्पादन शुल्क अकोला कार्यालयाकडे अर्ज केला. त्यावर सन २०२१ पर्यंतही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.
म्हणून तक्रारदाराने जानेवारी २०२२ पासून पाठपुरावा करणे सुरू केले. मात्र या कार्यालयातील कुणीही ताकास तूर लागू दिला नाही. अखेरीस या प्रकरणाच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचे मोबदल्यात राज्य उत्पादन शुल्क कार्यालय अकोलाचा शिपाई विशाल रमेश बांबलकर याने तक्रारदाराकडे पाच लक्ष रुपयांची लाच मागितली.
परंतु ही रक्कम फारच जास्त असल्याने तक्रारदाराने राज्य उत्पादन शुल्क आकोट कार्यालयाचा दुय्यम निरीक्षक संजय पांडुरंग कुटे याचेशी तडजोड केली. त्यावेळी तर तडजोडी अंती २ लक्ष ६० हजार रुपये देण्याचे ठरले. तडजोडी नंतर तक्रारदाराने लाच प्रतिबंधक विभाग अकोलाकडे या लाच मागणीची तक्रार केली.
हा सारा घटनाक्रम दिनांक १०.३.२०२३ रोजी घडला. त्यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यात येऊन अखेर दिनांक २३.५.२०२३ रोजी दुय्यम निरीक्षक संजय कुटे व शिपाई विशाल बांबलकर या दोघांना अटक करण्यात आली.
ही अटक राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय अकोला येथून करण्यात आली. अटक केल्यावर या दोन्ही आरोपीतांवर नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती लाच प्रतिबंधक विभाग अकोलाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सचिन सावंत यांनी दिली.