Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayतथाकथीत जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर!...नाना पटोले

तथाकथीत जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर!…नाना पटोले

गांधी कुटुंबावर खोटे आरोप करणारे गुलाम नबी आजाद कृतघ्न…

मुंबई, दि. ३० ऑगस्ट
काँग्रेस पक्षाने ज्या नेत्यांना विविध पदे, प्रतिष्ठा, मान, सन्मान दिला परंतु एखादे पद मिळाले नाही म्हणून स्वार्थापोटी हे लोक काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत. गांधी परिवाराने या नेत्यांना सर्व महत्वाची पदे दिली पण आज त्याच गांधी परिवाराविरोधात चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. गुलाम नबी आझाद यांनाही पक्षाने व गांधी कुटुंबाने ५० वर्षात सर्व महत्वाची पदे दिली परंतु आझाद व तथाकथीत जी २३ नेते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर कटकारस्थाने करत आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रशिक्षण व प्रबोधन समितीच्या वतीने नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरास भेट देऊन काँग्रेसजनांना संबोधित केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, मी खासदारकीचा राजीनामा देताच दुसऱ्या दिवशी माझ्या बंगल्याचे वीज, पाणी कनेक्शन कापले होते पण गुलाम नबी आजाद हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना दिल्लीत त्यांचा सरकारी बंगला व सोयी सुविधा अजूनही कायम आहेत. ते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर काँग्रेसला बदनाम करत आहेत. देशात आज गंभीर परिस्थिती आहे, सीमेवर चीनच्या कारवाया वाढलेल्या आहेत, संविधान धोक्यात आहे अशावेळी भाजपाला प्रश्न विचारण्याऐवजी हे नेते काँग्रेस पक्षालाच बदनाम करण्याचे काम करत आहेत.

भाजपा देशभरात हायवेचे जाळे पसरवल्याचा डंका पिटत आहे पण त्यासाठी काढलेल्या कर्जाच्या व्याजापोटी दर महिन्याला ४४ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. जनतेवर एवढा मोठा कर्जाचा बोझा टाकून विकास कसला करता. मुंबई- गोवा महामार्ग १२ वर्षांपासून रखडलेला आहे, खड्डे बुजवण्याचे आदेश दिले तरी ते बुजवले जात नाहीत. या खड्ड्याने अपघात होऊन लोकांचे जीव जात आहेत. कारण भाजप सरकारमधील लोकच या रस्त्यांचे ठेकेदार आहेत, त्यांना फक्त मलिदा खायचा आहे. देशभरातील हायवे असो वा समृद्धी महामार्ग असो यात किती पाप लपले आहे हे येणाऱ्या काळात समजलेच.

प्रशिक्षण व प्रबोधन समितीचे शिबीर नवी मुंबईत संपन्न.

देशात आज अनेक गंभीर समस्या आहेत, महागाई, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, संविधान उद्ध्वत करण्याचे काम केले जात आहे. देशाच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि केंद्रातील सरकार या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्रातील सरकारचे हे अपयश जनेपर्यंत पोहचवण्यासाठी, लोकांपर्यंत वास्तव पोहचावे यासाठी काँग्रेस पक्षाने शिबिरांचे आयोजन केले आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाचा पर्दाफाश करणे ही या प्रशिक्षणामागची संकल्पना आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. तसेच तरुणांना काँग्रेस पक्षासी जोडण्याचा प्रयत्नही आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

प्रदेश काँग्रेस आयोजित “प्रशिक्षण व प्रबोधन समिती”चे प्रशिक्षण शिबिर नवी मुंबई येथे पार पडले यावेळी या समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, नवी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: