मराठा आरक्षणावरील काँग्रेसच्या भुमिकेबद्दल नितेश राणेंनी आधी पिताश्रींना तरी विचारावे.
मुंबई, दि. २ नोव्हेंबर २०२३
आरक्षणप्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि ती वेळोवेळी काँग्रेसने जाहीर केलेली आहे पण भाजपाचे आमदार नितेश राणे यांना त्याची माहिती नसावी म्हणून अज्ञानातून त्यांनी काँग्रेसची भूमिका विचारली आहे. देशभरातील विविध जातींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर, ‘जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे’, असा ठराव काँग्रेस पक्षाने हैदराबादच्या CWC बैठकीत केलेला आहे. आता नितेश राणे यांनीच सांगावे की केंद्रातील भाजपाचे नरेंद्र मोदी सरकार जातनिहाय जनगणना का करत नाही? व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा का हटवत नाही? हे सांगावे असे प्रत्युत्तर प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे.
भाजपा आमदार नितेश राणेंनी मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणविसांचे प्रवक्ते नितेश राणे यांनी आरक्षणावर त्यांची भूमिका काय आहे ते आधी समजून घ्यावे. फडणविसांच्या नादाला लागून ते मराठा आरक्षणाला विरोध करत असून यामुळे समाजाचे नुकसान होत आहे याचाही त्यांना विसर पडलेला दिसत आहे. पृथ्वीराज चव्हाण सरकार असताना २०१४ साली मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षणाचा देण्याचा काँग्रेस आघाडी सराकरने निर्णय घेतला होता. यासाठी आमदार नितेश राणे यांचे पिताश्री श्रीमान नारायण राणे समिती नेमली होती, या समितीच्या अहवालावरच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. या आरक्षणाविरोधात कोर्टात कोण गेले होते ? याची माहिती नितेश राणे यांनी त्यांचे वडील श्रीमान नारायण राणे यांच्याकडून आधी घ्यावी व नंतर काँग्रेसच्या भूमिकेवर बोलावे. काँग्रेस सरकारने दिलेले मराठा आरक्षण आमदार नितेश राणे यांचे सध्याचे मालक देवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्तेपणामुळेच गेले आहे हे तपासून पहावे, त्याचा अभ्यास करावा. उगाच सकाळी सकाळी अर्धवट झोपेत काहीही बडबड करु नये.
आमदार नितेश राणे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या भूमिकेवरही प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी मनोज जरांगे यांना फोन का केला नाही? ट्विट का केले नाही, अशी विचारणा नितेश राणे करत आहेत. राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, आरक्षणावर निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणातील ‘म’ तरी काढला का ? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीत आले होते त्यावेळी ते जरांगे पाटील यांना आंतरावली सराटी येथे जाऊन का भेटले नाहीत? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आता राहुल गांधी पंतप्रधान असते तर जरांगे पाटील यांना उपोषण करावेच लागले नसते. मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याबद्दल बोलण्याची कुवत, उंची व पात्रता नितेश राणे यांची नाही. त्यांनी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाचे नेते यांच्याबद्दल बोलताना अभ्यास करुन, योग्य माहिती घेऊन बोलावे, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही अतुल लोंढे यांनी दिला आहे.