अकोला : भाजपचा मजबूत गड असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात यावेळी कॉंग्रेस बाजी मारणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे यावेळी मोठ आव्हान भाजपपुढे राहणार आहे. कारण या लोकसभा निवडणुकीत ‘अकोला पश्चिम’मध्ये काँग्रेसने १२ हजारांवर मतांची आघाडी घेतल्याने भाजपच्या चिंतेत वाढ झाली. तब्बल २९ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ भाजपाकडे कायम ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्वाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. एकीकडे या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी असून उमेदवारीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे. तर कॉंग्रेस कडूनही भावी उमेदवारांनी पक्ष श्रेष्ठीकडे अर्ज दाखल केले आहेत
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस कडून बऱ्याच भावी उमेदवाराची यादी असून यातील चांगला निष्ठावंत, भाजपला टक्कर देणार अश्या उमेदवाराला उमेदवारी देणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यांनी सलग सहा निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणल्याने त्यांच्या एवढा तुल्यबळ नेता भाजपला आता मिळणे शक्य नसल्याने यावेळी याचाच फायदा कॉंग्रेस पक्ष घेणार आहे. म्हणूनच कॉंग्रेस या मतदारसंघात स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देणार आहे. ज्याच सामाजिक कार्यही उल्लेखनीय असेल अश्याच उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार असल्याचे बोलले जाते.
अकोला पश्चिममध्ये भाजप आणि वंचित बहुजन आघाडीकडून कोणाला उमेदवारी देणार यावरही कॉंग्रेसच्या उमेदवारीच गणित अवलंबून राहील. भाजप नेतृत्व शर्मा कुटुंबात उमेदवारी देणार की इतरांना संधी देणार, हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. याशिवाय माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी, ॲड. मोतीसिंह मोहता, विजय अग्रवाल, गिरीश जोशी यांच्यासह २२ पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. तर कॉंग्रेस कडूनही बरीच लिस्ट आहेत त्यापैकी आघाडीवर असलेली नावे अन्नपुर्णेश पाटील, रमाकांत खेतान, साजिद खान पठाण, विवेक पारसकर यासह बरीच नावे आहेत. मात्र यावेळी मराठा समाजातील चांगल्या व्यक्तीला उमेदवारी देणार असल्याचे बोलले जाते. पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाला संमती देणार हे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावरच कळेल.