Thursday, September 19, 2024
Homeराज्यनुकसान भरपाई मदतीपासून वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी काँगेसचे आमरण उपोषण...

नुकसान भरपाई मदतीपासून वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी काँगेसचे आमरण उपोषण…

मौदा (ताप्र) – राजू कापसे

खरीप आणि रब्बी हंगामातील अवकाळी पावसामुळे झालेल्या गहू आणि धानाच्या पिकाच्या नुकसानीचे योग्य पद्धतीने पंचनामे न केल्यामुळे तालुक्यातील हजारों शेतकरी प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे नुकसान भरपाई मदतीपासून वंचीत राहिल्यामुळे सोमवार दि. ९ सप्टेंबर पासून काँग्रेस पक्षाकडून उपोषनाला सुरुवात करण्यात आली.

सदर आमरण उपोषण जि.प. सदस्य योगेश देशमुख, पं.स. सभापती सभापती स्वप्नील श्रावणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन मेश्राम आणि पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांनी सन २०२३ चे रब्बी हंगामात आपले शेतात गहू पिकाची पेरणी केली, पिक अत्यंत चांगले होते. कारण शेतीची मळणी, पेरणी, पाणी, फवारणी, निंदण, खुरपन आदी केले होते. परंतु ऐन पिक कापणीचे जवळ तर काही पीक भरले असतानी अवकाळी पाऊस आला आणि ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण मौदा तालुक्यातील रब्बी हंगामातील गहू जमिनीवर अक्षरशः लोळला त्याची फुल बारावर असल्याने भरली नाही.

यामळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे ९०% नुकसान झाले. कारण लागवडी करिता येणारा खर्च, रासायनिक खते व बियाणे, औषधी व इतर मेहनत खर्च होवून संपूर्ण पिकाचे नुकसान झाले ह्याची प्रशासनाला माहिती आहे.

याबाबतीत झालेल्या नुकसानीचा ऑनलाईन पद्धतीने ई-पंचनाने करावे असे आदेश महाराष्ट्र शासनाने तहसीलदारांना दिले होते. परंतु तहसीलदार आणि त्यांनी ह्या कार्यासंबंधी नियुक्त केलेले कर्मचारी यांनी रितसर पूर्णतः सर्व्हे न करता आपल्या कार्यालयीन कामकाजात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करीत अर्धवट पंचनाने केलेत.

असा आरोप उपोषण र्त्यांनी केला आहे. आता जेव्हा तालुक्यांत नुकसान भरपाई मदत मिळत आहे, यात तालुक्यांतील शेकडो शेतका-यांचे हजारो एकराचे पिक पंचनामा न केल्याने सुटलेले आहे.

याबाबतीत जि.प. सदस्य योगेश देशमुख यांनी वारंवार तहसील कार्यालयात निवेदन सादर करून हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला होता. ई- सर्व्हे यादीमध्ये नावे नसलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांची ऑफलाईन पध्दतीने सर्व्हे ची पूनश्च यादी मागवून नुकसान भरपाईची मदत मिळवून द्यावी व सदर कामात हलगर्जीपणा केलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतही निवेदनाच्या माध्यमातून कळविले होते.

कारण नैसर्गिक आपत्ती हा संवेदनशील विषय असुन सदर कामात हलगर्जीपणा करणे हे प्रशासकिय दृष्ट्या अत्यंत चिंताजनक आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घेवून कार्यवाही केली नाही तर आम्ही आंदोलन करू अशी सूचना सुध्दा पत्रानुसार प्रशासनास दिलेली होती. परंतू तहसील कार्यालयाने सदर विषयाला गांभिर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे उपोषण कर्त्यांनी आजपासुन तालुक्यातील वंचीत शेतकऱ्यांना सोबत घेवून तहसील कार्यालय समोर उपोषण सूरू केलेले आहे.

आमरण उपोषणकर्त्याच्या मांगण्या

१) तहसीलदार आणि त्यांनी ह्या कार्यासंबंधी नियुक्त केलेले कर्मचारी यांनी रितसर पूर्णतः सर्व्हे न करता आपल्या कार्यालयीन कामकाजात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करीत अर्धवट पंचनाने केलेत यामुळे तालुक्यातील हजारों शेतकरी नुकसान भरपाई मदतीपासून वंचित राहिलेत. त्यामुळें अपूर्ण पंचनामे करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत.
२) रब्बी हंगामात नुकसानग्रस्त शेतकरी ज्यांचे पंचनामे झाले नाहित अशा सर्व शेतकऱ्यांना पात्र करून नुकसान भरपाई मदत मिळवून द्यावी.
३) माहे सप्टेंबर आणि नोव्हेंबर २०२३ मधे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे धान पिकाची नुकसान भरपाई मदत न मिळालेल्या तालुक्यांतील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मदत मिळवून द्यावी.
४) माहे सप्टेंबर आणि नोव्हेंबर २०२३ मधे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे धान पिकाची नुकसान झाली परंतू नुकसान भरपाई यादीत बनवितेवेळी कर्मचाऱ्यांनी जाणीवपुर्वक हलगर्जीपणा करत अपूर्ण यादी तयार केली अशा सर्व दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
५) नुकसान भरपाई यादीत काही शेतकऱ्यांच्या शेतीची आराजी कमी दाखविल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत कमी मिळाली. अशा शेतकऱ्यांना पूर्ण शेतीची नुकसान भरपाई मदत मिळवून द्यावी.
६) E-KYC न केल्यामुळें तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत मिळाली नाही. त्यामुळे E-KYC ची अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई ची मदत देणेबाबत.
७) ऑनलाईन पंचनामा सर्व्हेच्या यादीतून तांत्रीक अडचणीमुळे तालुक्यातील हजारों शेतकऱ्यांचे नावे रीजेक्ट झालीत. त्यामुळे ऑनलाईन पंचनामा यादीतून नावे रीजेक्ट झालेल्या सर्व शेतकऱ्यांची ऑफलाईन पध्दतीने यादी मागवून त्यांनाही नुकसान भरपाई मदत मिळवून द्यावी.
८) कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या नुकसान भरपाई यादीत अनेक शेतकऱ्यांच्या नावात, आधार कार्ड क्रमांकात व बँक खाते क्रमांकात प्रिंट मिस्टेक झालेली आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांची E-KYC झाली नाही. तसेच याबाबत काही शेतकऱ्यांना माहिती सुध्दा झाली नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत मिळाली नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत मिळवून द्यावी.
९) तालुक्यातील काही गावांत गहू पिकाच्या नुकसानीच्या पंचनामे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेले नाहित. अशा पंचनाने न झालेल्या तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांच्या ऑफलाईन पध्दतीने यादी मागवून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत मिळवून द्यावी.

वरील सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आमचे आमरण उपोषण मागे घेणार नाही असेही उपोषण कर्त्यांचे म्हणने आहे. यावेळी योगेश देशमुख यांचेसोबत स्वप्नील श्रावणकर, रोशन मेश्राम, दीपक गेडाम, ज्ञानेश्वर वानखेडे, राजेश ठवकर,

शालिनी देशमुख, राजेंद्र लांडे, दादाराव सार्वे, रामनरेश सेणवार, विक्की साठवणे, मंगेश तलमले, रवी चरडे, श्रीनु यांगटी, उमेश झलके व शेकडो शेतकरी उपस्थीत होते. यावेळी उपोषण स्थळी सुरेश भोयर, अवंतिका लेकुरवाळे, तापेश्र्वर वैद्य, प्रसन्ना तिडके यांनी भेटी दिल्या.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: