Monday, December 23, 2024
Homeराज्यमहाकवी वामनदादा कर्डकोत्तर आंबेडकरी लेखणीचा भाष्यकार हरपला… आंबेडकरी कवी उत्तमदादा फुलकर...

महाकवी वामनदादा कर्डकोत्तर आंबेडकरी लेखणीचा भाष्यकार हरपला… आंबेडकरी कवी उत्तमदादा फुलकर यांचे दुःखद निधन…

न्युज डेस्क – माझी दहा भाषणं आणि कवींचा एक जलसा ” असं खुद्द बाबासाहेबांनी म्हटलेलं अनमोल वाक्य इतिहासात अधोरेखित आह़े…या परंपरेत आद्य आंबेडकरी जलसेकार भिमराव कर्डक , कविरत्न केरुजीबुवा गायकवाड , महाकवी वामनदादा कर्डक , भादोलाकार किसन गवई गोपीनाथ मिसाळ , कवी गायक राजानंद गडपायले,

कव्वाल नागोराव पाटणकर , आणि अनेक कवी गायकांचा समावेश असून अनेक लहानमोठ्या कवी आणि गायकांची आंबेडकरी कविता आणि आंबेडकरी गायकीची फॅक्टरी उघडणारे लोककवी उत्तमदादा फुलकर यांचं नाव आपणांस आदराने आणि अगत्याने घ्यावं लागेल…

आयुष्यभर इमाने इतबारे आपली लेखणी आंबेडकरी चळवळीला वाहून घेणाऱ्या कवी गायकांपैकी ऊत्तमदादा एक होत…भीमशाहीर कवी सम्दुर सारंग यांना घडविण्यात उत्तमदादा यांचा बहुमोल असा वाटा होता…आणि सम्दुर सारंग यांनीही आयुष्यभर उत्तमदादा यांच्या लेखणीचे ऋण मानत आपल्या बहुतांश काव्यात उत्तमदादांना अग्रस्थान दिले…

उत्तमदादा नेहमीच हसतमुख असणारे ,मनात अपार करुणा आणि चेहऱ्यावर मुदिता असणारे खऱ्या अर्थाने बुद्धतेच्या मार्गावर क्रमण करणारे एक उत्तम पंथक होते…बाबासाहेबांच्या काळापासून आत्ताच्या आंबेडकरी रॅप टोलीच्या स्थित्यंतरापर्यंत त्यांनी आंबेडकरी गायकी आणि संगीतातले अनेक आयाम पाहिले …परंतु या अनुभवाचे त्यांनी कधी भांडवल केले नाही की या अनुभवांना लाखांच्या बिदागीत बंदिस्त केले नाही…आंबेडकरी जनतेचे प्रेम ,मायेने बोलणे ,आणि उत्तम जगणे या त्रिसरणात त्यांनी आपले आयुष्य झिजवले…

आंबेडकरी लेखणी कधीही व्यावसायिक होऊ शकत नाही तर ती समाजाभिमुख असल्यामुळे तिचा इतिहास चिरंतन काळापर्यंत टिकतो आणि येणारी पिढी त्यातून आपल्याला हवं असणारं नवं बौद्धिक खाद्य ग्रहण करते अशी त्यांची ठाम धारणा होती… अनेक कवी गायक वा कार्यकर्ते हे जसं जसं वय वाढते तसं तशे थोडे चीडचीडे आणि रागीट होतात …कुणी भेटायला आलं की रागावतात अंगावर खेकसतात…

कारण चळवळीतला चढता काळ अन् उमेदीची वेळ त्यांनी पाहिलेली असते आणि उतरत्या वयात आणि उतरत्या काळाचं हे गणित पचवणं त्यांना अवघड जातं ….परंतु याला उत्तमदादा अपवाद होते आणि आहेत …आयुष्याच्या शेवटाकडे जात असतानासुद्धा ते अत्यंत आनंदी आणि समाधानी होते …नवलेखकांना आणि नवकवींना उभारी देणं यामध्ये त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले …त्यांचा कवितासंग्रह “उत्तमा” यामध्ये त्यांनी लिहिलेल्या हजारो काव्यांपैकी 59 निवडक कविता प्रसिद्घ झाल्या आहेत…

लोककवी उत्तमदादा फुलकर यांनी आंबेडकरी विचारांचा वसा आणि वारसा चालवताना सतत चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय हा तथागतांचा मूलमंत्र जपत गावोगावी खेडोपाडी वाड्यावस्तीवर आंबेडकरी विचार गायन आणि कवितेच्या स्वरूपात पोहोचवला…केवळ मीठ भाकरीवर रात्र रात्र जागून गायन पाटर्य़ाद्वारे आयोजकांनी दिलेल्या शब्दाला जागण्याचे कार्य केले…खऱ्या अर्थाने आंबेडकरी विचारांशी असलेली निष्ठा जागल्याच्या भूमिकेद्वारे जगणारे उत्तमदादा चळवळींत सर्वोत्तम ठरतात असे म्हणायला वावगे ठरणार नाही…

त्यांना त्यांच्या जीवनात अनेक पुरस्कार मिळाले …परंतु दैनिक वृत्तरत्न सम्राटने त्यांना गौरवान्वित केलेला सम्राट गौरव पुरस्कार त्यांना अतिशय महत्वाचा वाटत असे…दैनिक वृत्तरत्न सम्राटवर त्यांनी अतिशय निस्सीम आणि कुठलीही अट नसणारे प्रेम केले…सम्राट कार बबन कांबळे साहेब गेल्याची बातमी त्यांना उशिरा कळाली तेव्हा त्यांना अतिशय वेदना झाल्या…फोनवरून बोलताना ते गहिवरले…”आंबेडकरी पत्रकारितेचं विद्यापीठ आज अबोल झालं “…अशी प्रतिक्रिया त्यांनी आमच्याशी बोलताना दिली…

उत्तमदादांची प्रकृति बऱ्याच दिवसांपासुन बरी नव्हती…दादा जेव्हा जेव्हा फोनवरून बोलायचे तेव्हा तेव्हा ते भेटीला या म्हणून आवर्जून सांगायचे…या वेळी वेळ काढून आम्ही खास दादांच्या भेटीला जलम्बला गेलो…निमित्त होते आंबेडकरी साहित्य समीक्षेचे भाष्यकार हरीश खंडेराव यांच्या संदर्भग्रंथाचे नांदुरा येथें प्रकाशन …दादा घरी एकटेच होते…आम्ही गेल्यानंतर दादांना अतिशय आनंद झाला…ते उठायचा प्रयत्न करत होते आणि आम्ही त्यांना आराम करा असे म्हणत होतो…

शेवटी दादा उठलेच आणि त्यांनी आम्हाला पाणी दिले…मग मीच त्यांच्या किचनमध्ये गेलो आणि ब्लॅक टी ठेवला…मी आमचे काका अंबादास तायडे आणि उत्तमदादा तिघांनी मिळून चहा घेतला…आंबेडकरी चळवळीवर अनेक चर्चा झाल्या…दादांना इतका आनंद झाला की त्यांचं मन अगदी हर्षभरित झालं…या ही परिस्थितीत दादांनी आम्हाला म्हातारपणावर केलेली एक कविता खुद्द त्यांच्याच आवाजात म्हणून दाखविली…

“म्हातारपण माणसाचे दुसरे बालपण आह़े …
हे समजून घेणे सत्य तरुणांचे शहाणपण आह़े “

दादांची भेट झाली ती तारीख होती 07 नोव्हेंबर 2022 आणि आज तारीख आह़े 25 एप्रिल 2023…अवघ्या पाच महिन्यापूर्वी भेटलेले दादा आपल्याला सोडून जातील असेल कधी मनासही वाटले नव्हते …दादांचा तो स्पर्श आजही आठवतो …त्यांचं प्रेमळ बोलणं…नित्यनियमाने त्यांचा आठ पंधरा दिवस जास्तीत जास्त महिन्यांचा आत फोन येणं…

फोनवरून घरच्यांची मुलाबाळांच्यासह पत्नीची आरोग्याची चौकशी करणं अत्यंत मायेचं अन् आपुलकीचं होतं …आता दादांचा फोन येणार नाही परंतु त्याचं करुणामय बोलणं आम्ही आमच्या काळजाच्या कोपऱ्यात साठवून ठेवलं आह़े…. दादा कायमच आपण आमच्यासह आंबेडकरी चळवळीच्या लेखणी अन् निळ्या शाईत स्मरणात असाल …

शेवटी दादांचं एक भीमगीत आपल्या चळवळीतील लढवय्या कार्यकर्त्यांसाठी

“निकामी काया कुडी”

“ही निकामी काया कुडी मन कापराची वडी…
भिमाच्या पायदळी ही खण काळजाजी घडी …

ही बाग जीवनाची ना आगीत जळावी …
विसावा घेण्या जागा बुद्धविहारी मिळावी…
आस ही मनाची भोळी भाबळी …

त्यागूनी दुक्ख जिवनी आनंदी रहावे …
ते हृदयाचे फुल ताजे चरणासी वहावे…
कूचकामी ठरावी सुगंधी फुल पाकळी …

रक्तामासांच्या गाऱ्याने रंगवावा गाभारा …
हाडांच्या विटांनी माझ्या पाया पायरी उभारा …
मणका मणका कामी पडो विहारी पासळी …

मागणे उत्तमाचे हेच खुले आखरीला …
नयन दिप माझे नित जळो चाकरीला …
अखेर ना विझावी ही वादळात चिळी” …

दादा …आपल्या पंचधम्मक्खन्धास सुगति लाभो …आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन ….

“अनिच्चा वत सन्खारा …
उप्पाद वय धम्मिनो ….
उप्पज्जित्वा निरुज्झन्ति …
तेसं वूप समो सुखो”…

आपला कायमच स्मरणार्थी

आनंद दिवाकर चक्रनारायण

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: