अकोला – संतोषकुमार गवई
अकोला जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, सहभागाची शेवटची तारीख 15 जुलै आहे. त्यामुळे तत्पूर्वी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. जिल्ह्यात सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी आदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत केवळ एक रू. भरून पोर्टलवर सहभागाची नोंदणी करता येईल.
अकोला जिल्ह्यात योजनेसाठी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. तिचा डी- ३०१, तिसरा मजला, ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रिक्ट (मॅग्नेट मॉल) लाल बहादुर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई-४०००७८ आणि ई-मेल [email protected] असा आहे.
पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्रधारकाला विमा कंपनीमार्फत प्रती अर्ज 40 रू. देण्यात येतात. त्यानुषंगाने सर्व शेतक-यांनी सामूहिक सेवा केंद्रधारकाकडे केवळ 1 रुपया भरून सहभागाची नोंदणी करावी. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी नजिकचे सामाईक सेवा केंद्र, बँकेतून अथवा पीएमएफबीवाय पोर्टलवर (pmfby.gov.in) स्वत: शेतकरी तसेच एआयडीई अॅपद्वारे डिजीसेफ ब्रोकरेज कंपनीचे प्रतिंनिधीमार्फत विमा काढता येईल.
पीक विमा नोंदणी करताना आधार संलग्न बँक खाते क्रमांक बंधनकारक करण्यात आले असून या क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यावरच विम्याचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी दिली. अधिक माहितीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. किरवे यांनी केले.