Monday, December 23, 2024
Homeराज्यआकोट बाजार समितीवर सहकार गटाचा झेंडा...१८ पैकी १५ जागांवर कब्जा… विरोधकांची दुफळी...

आकोट बाजार समितीवर सहकार गटाचा झेंडा…१८ पैकी १५ जागांवर कब्जा… विरोधकांची दुफळी सहकारच्या पथ्यावर…पाचडे सपकाळ सभापती उपसभापती पदांकरिता चर्चेत…

आकोट – संजय आठवले

मोठ्या धामधुमीत पार पडलेल्या आकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारून १८ पैकी तब्बल १५ जागांवर कब्जा करीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीची आकडेवारी पाहता विरोधकांची झालेली दुफळी सहकार गटाच्या चांगलीच पथ्यावर पडल्याचे दिसून आले असून या निवडणुकीत क्रॉस वोटिंगही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. यासोबतच प्रशांत पाचडे व श्रीकांत (गोपाल) सपकाळ या दोन युवकांची नावे सभापती व उपसभापती पदाकरिता चर्चिल्या जात आहेत.

तर व्यापारी व हमाल मतदार संघातून निवडून आलेले तीनही अपक्ष उमेदवार सहकार पॅनलच्याच गोटात जाणार असल्याचे संकेत आहेत. आकोट बाजार समिती निवडणुकीचे वैशिष्ट्य हे आहे कि, ही निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाचे नावावर नाही तर पॅनल द्वारे लढविली जात आलेली आहे. यावेळीही त्याच पद्धतीचा अवलंब केला गेला. तरीही राजकीय पक्षांचा हिशेब पाहू जाता निवडून आलेले सहकार पॅनल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांचे अधिक्य असलेले पॅनल आहे. विरोधात असलेले शेतकरी व कास्तकार हे दोन्ही पॅनल शिवसेना ठाकरे गटाचे आहेत.

चौथे जय किसान पॅनल हे कच्चा लिंबू म्हणून मानले गेल्याने त्या पॅनलचा राजकीय पक्षाच्या दृष्टीने विचारच केला गेला नाही. साऱ्या पैनल्सची अशी स्थिती असल्याने सहकार, शेतकरी अथवा कास्तकार यापैकी कोणतेही पॅनल निवडून आले तरी त्याची गणना महाविकास आघाडीतच होणार होती. आता सहकार पॅनल आल्याने हे पॅनलही महाविकास आघाडीतच असणार हे उघड आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा हिशेब केल्यास ते सहकार पॅनल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कोट्यात गणले जाणार आहे.

या मतमोजणी दरम्यान काही लक्षणीय लढतींकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघात शेतकरी पॅनलचे प्रमुख संजय गावंडे आणि सहकार पॅनलचे गजानन डाफे यांच्यात चांगलीच झुंज झाली. त्यामध्ये ५१ मतांचे आधिक्य घेऊन गजानन डाफे हे विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघात एडवोकेट भूषण घनबहादूर आणि प्रमोद खंडारे यांची जबर टक्कर झाली. त्यामध्ये अवघ्या १० मतांच्या आधिक्याने प्रमोद खंडारे विजयी झाले.

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदार संघात शेतकरी पॅनलचे प्रवीण डिक्कर आणि सहकार पॅनलचे शंकरराव लोखंडे यांच्या लढतीत लोखंडे यांनी २१ मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात सहकारचे श्रीकांत सपकाळ आणि वंचितचे प्रदीप वानखडे यांचेमध्ये मोठा संघर्ष झाला. त्यामध्ये श्रीकांत सपकाळ हे बारा मतांचे आधिक्य घेऊन विजयी झाले. याच मतदारसंघात प्रहारचे कुलदीप वसु आणि प्रहारचेच निखिल गावंडे हे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामध्ये कुलदीप वसु यांनी बाजी मारली.

मागील काळात आकोट बाजार समितीमध्ये प्रशासक म्हणून राहिलेल्या ५ लोकांनी या निवडणुकीत जोर आजमाईश केली. त्यामध्ये मुख्य प्रशासक म्हणून राहिलेले गजानन पुंडकर तर प्रशासक म्हणून राहिलेले निखिल गावंडे आणि श्याम गावंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर रितेश अग्रवाल आणि कुलदीप वसु या २ माजी प्रशासकांनी मात्र आपल्या मतदारसंघात बाजी मारली.
या निवडणुकीत सर्व उमेदवारांना मिळालेली मते येणेप्रमाणे—सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ – (विजयी उमेदवार) – प्रशांत पाचडे ३३४,

धीरज हिंगणकर ३१६, अतुल खोटरे ३१३, विजय राहणे २९१, बाबुराव इंगळे २८८, शाम तरोळे २८५, गजानन डाफे २६९, पराभूत ऊमेदवार – किशोर आवारे १४८, मनोहर कुलट १२६, रघुनाथ खेडकर ३३, दिलीप गायकवाड ४०, प्रशांत गावंडे ३९, संजय गावंडे २१८ डॉक्टर प्रमोद चोरे १२६, मनोहर डोके ४२, ज्ञानेश्वर ढोले १३५, सुरेश दोड १०९, दादाराव पेटे १२१, गजानन पुंडकर १२७, संजय पुंडकर १४६, राजेश भालतिलक १३५, कैलास मेतकर १६५, निळकंठ मेतकर ११६, गोवर्धन म्हसाळ ३५, अतुल म्हैसने २०९, मदन रोकडे ३४, विलास वसु १३६, राजू शेंडे १५७.

या मतदारसंघात एकूण ६७० मते वैध तर ४४ मते अवैध ठरविण्यात आलीत. सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघ – अविनाश जायले ३०७ (विजयी), प्रदीप उर्फ बंडू कुलट ३३, डॉक्टर गजानन महाले १६५, राजेश मंगळे १६५. या मतदारसंघात ६७० मते वैध तर ४४ मध्ये अवैध ठरविण्यात आलीत. सहकारी संस्था विमुक्त जाती मतदार संघ – रमेश वानखडे ३४१ (विजयी), रतनलाल तायडे ३४, तसलीम शहा लूकमानशाह ९९, काशीराम साबळे १९६.

सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघ – सौ. अंजली सोनोने ३१६ (विजयी), सौ. अरुणा आतकड ३१५ (विजयी), सौ. राधिका अरबट १४०,सौ. वंदना गावंडे १६२, सौ.शारदा दोड ३४, सौ. सुनीता फसाले १८०, सौ. हरिदिनी वाघोडे १५२, या मतदारसंघात ६८६ मते वैध तर २८ मते अवैध ठरली.

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ – कुलदीप वसु २६२ (विजयी), श्रीकांत सपकाळ २१४ (विजयी), रश्मिकांत खोटरे ४६, निखिल गावंडे १७३, श्याम गावंडे १४२, संदीप चौधरी ३०, शरद नहाटे १३०, प्रदीप वानखडे २०२. या मतदारसंघात वैध मते ६५० तर अवैध मते ४८ होती. ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघ – प्रमोद खंडारे २२० (विजयी), एडवोकेट भूषण घनबहादुर २१०, पांडुरंग तायडे १८०, गजानन ताराम ३०. या मतदारसंघात ६४० मते वैध तर ५९ मध्ये अवैध ठरली.

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदारसंघ – शंकरराव लोखंडे २३३ (विजयी), प्रवीण डिक्कर २१२, गोपाल रावणकार २८, विलास साबळे १७७. हमाल व मापारी मतदारसंघ – अजमल खान आसिफ खान २४४ (विजयी), यासीन शाह ०९, रियाज उल्ला खान बिस्मिल्ला खान १०, शेख जमीर शेख ख्वाजा १६३. या मतदारसंघात ४२६ मते वैध ठरली असून १५ मते अवैध झाली आहेत. तर व्यापारी व अडते मतदारसंघात यापूर्वीच रितेश अग्रवाल आणि सुनील गावंडे हे दोन उमेदवार अविरोध निवडून आलेले आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: