Friday, November 8, 2024
Homeराज्यकवी कुलगुरू कालिदास स्मारकाचे श्रमदानातून स्वच्छता अभियान…

कवी कुलगुरू कालिदास स्मारकाचे श्रमदानातून स्वच्छता अभियान…

रामटेक – राजू कापसे

सुप्रसिद्ध लेखक व ख्यातनाम कादंबरीकार पद्मभूषण डॉ. भैरप्पा यांना महर्षी वाल्मिकी पुरस्काराने दिनांक २०.१०.२४ रोजी कवी कुलगुरू कालिदास सभागृह नागपूर येथे सन्मानित केले गेले.

यावेळी डॉक्टर भैरप्पा यांनी रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास स्मारकाला भेट देण्याचे इच्छा व्यक्त केली. दिनांक २१.१०.२४ रोजी त्यांनी भेट देऊन आधुनिक कादंबरीकराने गतकाळातील थोर कवि कालिदासास आदरांजली वाहिली.

स्मारक अतिशय सुंदर असल्याचे सांगून त्याचा गौरव करून आनंद व्यक्त केला. परंतु स्मारकाची श्रद्धेने पाहणी करत असतांना स्मारका सभोवताली वाढलेले गवत व स्मारकाची झालेली दुरावस्था पाहून ते अत्यंत व्यथित झालेत व त्यांच्या सोबतच्या व्यक्तींसमोर आपली खंत व्यक्त केली. हि व्यथा वृत्तपत्राने बातमीद्वारे लोकांसमोर उजागर केली.

त्याअनुषंगाने दिनांक २७.१०.२४ रविवारी हिंदु रिसर्च फाउंडेशन च्या पुढाकाराने व स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या साहकार्याने कवि कुलगुरु कालिदासांच्या स्मारकाचे श्रमदानातून स्वच्छता अभियान आयोजित केले गेले.

ह्या स्वच्छता अभियानात कृष्णा भाल, अध्यक्ष हिंदु सेवा संघ, रामटेक व एनटीपीएस संस्थेचे संचालक जगन्नाथ गराट यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातून स्मारकाची स्वच्छता मोहीम राबवली गेली.

यावेळी स्वच्छता श्रमदान कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात हिंदू सेवा संघ , सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्था, योगीराज हॉस्पिटल, एनटीपीएस हिवरा बाजार, विदर्भ साहित्य संघ, एकविरा माता भक्तगण, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते.

सर्वांनी स्वेच्छेने, निरपेक्ष, निस्वार्थ हेतूने हिरीरीने भाग घेऊन कवी कुलगुरू कवि कालीदासांच्या स्मारकाची स्वच्छता मोहीम राबविली.

या स्वच्छता अभियानात श्री नाना नागपुरे व नगर पालिका रामटेक यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी उपस्थित झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे हिंदू रिसर्च फाउंडेशन व हिंदू सेवा संघातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: