न्यूज डेस्क : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात बुधवारी एका घरात झालेल्या स्फोटात 5 मुलांसह 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. सर्व मृत एकाच कुटुंबातील होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना बाहेर रॉकेटचे लॉन्चरचे कवच सापडले होते, जे ते खेळणी आहे असे समजून त्यांनी घरी आणले होते. खेळत असताना रॉकेटचा स्फोट होऊन पाच मुलांसह एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला.
कश्मोर-कंधकोटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) रोहिल खोसा यांनी सांगितले की, मुले खेळत असताना रॉकेटचा शेल सापडला. त्यांनी रॉकेट शेल घरी आणले होते. या स्फोटात पाच मुलांव्यतिरिक्त दोन महिला आणि दोन पुरुषांचाही मृत्यू झाला. या स्फोटात मृतांव्यतिरिक्त पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
खोसो म्हणाले की, ज्या भागात ही घटना घडली तो नदीचा परिसर आहे. नदीच्या परिसरात लपलेल्या गुन्हेगारी टोळीने रॉकेट शेल तेथे सोडले असावे. एसएसपी म्हणाले की, स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी ट्विट करून या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सिंध आणि पंजाबमधील नदीकाठचे भाग काही गुन्हेगारी टोळ्यांचे आश्रयस्थान बनले आहेत. बिलावल यांनी पाकिस्तानच्या अंतरिम सरकारला हा भाग गुन्हेगारी तत्वांपासून मुक्त करण्याचे आवाहन केले.
सिंधचे मुख्यमंत्री न्यायमूर्ती मकबूल बकर यांनी प्रांतीय महानिरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे, असे डॉन न्यूजने म्हटले आहे. त्यांनी विचारले आहे की रॉकेट लाँचर जंगी सबजवाई गोठ गावात कसे पोहोचले? तसेच या परिसरात शस्त्रास्त्रांची तस्करी होत आहे का, अशी विचारणा केली. बॉम्बस्फोटाच्या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्याबद्दलही त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच सविस्तर तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश महानिरीक्षकांना दिले.