नांदेड – महेंद्र गायकवाड
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. ग्रामस्तरीय समितीला प्रत्येक गावांमध्ये कॅम्प ( शिबीर ) घेण्याचे सूचित केले आहे. तसेच ठीक ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची सुविधा करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनतेने याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व त्यांची पूर्ण चमू तसेच नांदेड महानगरासाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात दररोज आढावा घेत असून ठिकठिकाणी भेटी देत आहे. राज्य शासनाने नव्या शासन आदेशानुसार ग्रामस्तरीय समितीने गाव पातळीवर शिबिर आयोजित करून अर्ज भरण्याचे स्पष्ट केल्यामुळे आपल्या गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड करणे ही जबाबदारी या समितीवर आली आहे.
ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील
या योजनेचे सर्व अर्ज शेवटी ऑनलाइन करणे अनिवार्य आहे. तथापि, हे अर्ज ऑनलाईन करताना अनेकांना अडचणी येत आहेत. कधी कधी सरवर डाऊन असल्यामुळे अर्ज स्वीकारले जात नाहीत. तातडीने लिंक सुरू होत नाही. अनेकांना अर्ज अपलोड करणे जमत नाही. अशा अनेक अडचणी आहेत. मात्र यासाठी प्रशासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षित केले आहे. योग्य प्रकारे भरलेला फॉर्म स्वीकारण्याचे त्यांना सांगितले आहे.त्यानंतर अर्ज अपलोड करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे ऑफलाइन की ऑनलाईन हा प्रश्न निकाली निघाला असून ज्यांना स्वतः ऑफलाइन भरणे शक्य आहे त्यांनी तो भरावा अन्यथा संबंधित यंत्रणेला हस्तांतरित करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे .
आधार कार्ड नुसारच माहिती भरा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्तीदूत द्वारे अर्ज भरताना संबंधित महिलेचे नाव, जन्मदिनांक, संपूर्ण पत्ता आदी माहिती आधार कार्ड नुसारच भरावे, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी रेखा कदम यांनी केले आहे महिलेच्या खात्यावर या योजनेद्वारे मिळणारी रक्कम थेट जमा होणार आहे. त्यामुळे यात कोणताही अडचण पुढे राहू नये, यासाठी आधार कार्डवर जसे नाव असेल त्याच पद्धतीने नावे भरावी अशी सूचना त्यांनी केली आहे.
ग्रामस्तरीय समिती स्थापन करा
ग्राम पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी ,अंगणवाडी सेविका,आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्राम स्तरीय कर्मचारी यांची ग्राम स्तरीय स्थापित स्थापन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. सदर समितीचे संयोजक, ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असेल. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करावी. ऑफलाइन अर्ज यथावकाश ॲपवर व पोर्टलवर भरण्यात यावे,असे शासनाने नव्या आदेशात स्पष्ट केले आहे.
अर्ज भरण्यासाठी मिळणार प्रोत्साहन भत्ता
गाव पातळीवर ग्रामसेवक,तलाठी, अंगणवाडी सेविका ,मदतनीस, आशा सेविका, नागरी सेतू केंद्रातील प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यक्ती यांची समिती स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्यात आहेत. ऑनलाईन अर्ज पूर्ण भरण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी सेतू केंद्रातील प्रतिनिधी,समुदाय संसाधन व्यक्ती यांना प्रती अर्ज पन्नास रुपये प्रमाणे शासनाकडून प्रोत्साहन भत्ता देण्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे कोणीही अतिरिक्त पैसे कोणालाही देऊ नये, शासनाकडून भत्ता दिला जाणार आहे.
आता ऑनलाइन फोटोची गरज नाही
आपला अर्ज ऑफलाईन भरता येणार आहे. त्यामुळे या ऑफलाइन अर्जासोबत आपले फोटो जोडावे. पूर्वीसारखे ऑनलाईन फोटो काढण्याची आता गरज नाही. शासनाने काढलेल्या सुधारित नियमानुसार यामध्ये बदल करण्यात आला आहे. आपला फॉर्म ज्या ठिकाणी भरला जाईल त्यावरील फोटो अपलोड करण्याची जबाबदारी देखील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तथापि, ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य आहे त्यांनी मात्र सर्व प्रक्रिया करावी,असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
लाभार्थ्यांकडून शासनाचे आभार
दर महिन्याला दीड हजार रुपये आणि वर्षाला 18 हजार रुपये तेही थेट आपल्या खात्यामध्ये त्यामुळे आमच्या आर्थिक स्वातंत्र्याला बळकट येईल अशा प्रतिनिधिक प्रक्रिया महिलांनी या योजने संदर्भात दिल्या आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली महिलांसाठी आर्थिक क्रांती असल्याचे महिलांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे.