राज्याचं उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून त्याआधीच महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्यामुळे राजकिय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात येणाऱ्या निवडणुका लढविण्याचे वक्तव्य केले होते तर आता बावनकुळे यांनी देवेंद्र फडवणीस यांना मुख्यमंत्र्यांची मागणी केल्यानंतर शिंदे गटात कुजबुज सुरु झाली आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी त्यांचे हे वक्तव्य आले आहे. मी जोपर्यंत भाजप प्रदेशाध्यक्ष आहे तोपर्यंत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवे, असे ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, फडणवीस यांनी मराठा, धनगर किंवा इतर कोणत्याही समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. नागपुरात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना बावनकुळे म्हणाले की, जोपर्यंत मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे, तोपर्यंत फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हायला हवे.
नागपुरात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक आणि आर्ट गॅलरीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर तेली समाजातील नागरिक उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. त्यांनी म्हटले की, समाजाला जेव्हा काही द्यायचा प्रश्न आला, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की पुन्हा एकदा 2014 ते 2019 चा काळ महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व समाजातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहिले पाहिजे असे आवाहन बावनकुळे यांनी केले. फडणवीस यांनी कधीही आपल्याकडून (समाजाकडून) अपेक्षा व्यक्त केली नाही, की अमक्या समाजाने माझ्यासाठी हे करावं. देवेंद्र फडणवीस यांना फक्त पदावर बसवण्यासाठी नाही तर सर्व समाजाला न्याय मिळण्यासाठी आता आपली जबाबदारी वाढली आहे असे ही बावनकुळे म्हणाले.
तत्पूर्वी, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, फडणवीस यांच्याऐवजी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असा पक्षाने जड अंतःकरणाने निर्णय घेतला आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे आता विरोधी पक्षांना बोलण्याची संधी मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे की, यावरून विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांना भारतीय जनता पक्षात (भाजप) काहीच किंमत नसल्याचे दिसून येते.