आकोट- संजय आठवले
स्वतःच्या ओठांवर नसलेल्या मिशीला पिळ भरीत येत्या वर्षात हिवरखेड नगरपरिषद करूनच दाखविण्याची आमदार भारसाखळे यांनी केलेली राणा भीमदेवी थाटाची गर्जना केवळ शेखचिल्ली चे स्वप्नरंजन ठरले असून या गर्जनेद्वारे गंडविल्या गेलेल्या हिवरखेडकरांनी मात्र आपल्या या फसवणुकीचा मोठा उत्सव साजरा केला आहे. त्यांनी १ एप्रिल रोजी आपल्या फसवणुकीचे वर्णन करीत गावात चक्क लॉलीपॉप वाटप केले. हिवरखेडकरांच्या ह्या अनोख्या उत्सवाची परिसरात एकच चर्चा होत आहे.
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड हे सर्वाधिक मोठे गाव. येथील बाजारपेठही जबर. आपल्या दैनंदिन व्यवहाराकरिता निम्मा तेल्हारा तालुका हिवरखेडशीच जुळलेला. गाव चांगलाच सधन. येथील कृषी आणि कृषीतर व्यवसाय, उद्योग चांगलाच बहरलेला. त्याने रोजगाराची उपलब्धीही उत्तमच. गावची लोकसंख्या ही नजरेत भरण्याजोगी. त्यामुळे ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याचे निकष विनासायास पूर्ण झालेले. तरीही हिवरखेडकरांची तीव्र इच्छा असूनही हिवरखेड नगरपंचायत होत नव्हती. गावातील वजनदार व्यक्तीमत्वे त्याकरिता सातत्याने प्रयत्नशील होते. अखेरीस अमोल मिटकरी या आमदाराच्या सहकार्याने गावकऱ्यांनी हिवरखेड नगरपंचायत होण्याचा मार्ग मोकळा केला. शासनाचे सारे सोपस्कार पार पाडले गेले. आता केवळ स्वीकृतीचा शिक्का मारून संबंधितांची स्वाक्षरी होणे बाकी होते. तितक्यातच एक माशी शिंकली.
आणि आमदार भारसाकळे यांना अवदसा आठवली. आपल्या खेरीज काहीही होऊ न देण्याचा आणि कशाचेही श्रेय स्वतःकडेच घेण्याचा त्यांचा अहंकारी स्वभाव जागृत झाला. आणि चालत्या गाडीची खिळ काढून घेतली गेली. त्याकरिता भारसाखळे यांनी आपल्या पदाचा व सत्तेचा सदुपयोग? केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून त्यांनी या कामावर स्थगनादेश मिळविला. आमदारांच्या या अघोरी कृत्याचे हिवरखेडात प्रतिकूल पडसाद उमटले. लहान थोर हिवरखेडकर आमदारावर जाम संतापला. “स्वतः करीत नाही इतरांना करू देत नाही” या विघ्न संतोषी स्वभावाने आमदार हिवरखेडकरांच्या नजरेतून उतरले. ही बाब अतिशय धूर्त आणि संधीसाधू भारसाकळे यांनी ओळखली. हिवरखेडकरांच्या क्रोधाग्नीचे शमन करण्याकरिता काहीतरी करण्याची त्यांना निकड भासू लागली. आणि क्षणात त्यांची ट्यूब पेटून आपण ‘चॉकलेट किंग’ असल्याचे स्मरण त्यांना झाले.
त्यांनी लगेच आपल्या चार दोन खुश-मस्कऱ्यांना मंत्र दिला. त्यांनीही अनेक आभास निर्माण करीत काही पांचट मागण्या केल्या. आणि विकास पुरुषाने हिवरखेडकरांना भिक्कार स्वप्न बघण्याऐवजी मोठे स्वप्न पाहण्याचा मानभावी सल्ला दिला. बोटावर मोजणे ईतक्या लोकांनी या सल्ल्याची तळी उचलून धरली. हा सल्ला होता नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद करण्याचा. परंतु हक्काची अर्धी भाकरी सोडून आभासी पूरीच्या मागे लागण्यास एक विशिष्ट कंपू वगळता अख्या गावाने विरोध दर्शविला. पण त्याने भारसाखळे नाउमेद झाले नाहीत. नगरपरिषद ह्या गाजराने त्यांना अनेक हेतू तडीस न्यावयाचे होते. त्याकरिता त्यांनी ‘चालू वर्षातच नगरपरिषद करून दाखवीतो’ अशी वल्गना केली. वास्तविक हे होणे शक्य नाही, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. परंतु वेळ मारून न्यायची असल्याने आणि लोकांची स्मरणशक्ती अतिशय कमकुवत असल्याने ही वल्गना पचून जाईल असा भारसाखळे यांचा होरा होता.
अशा स्थितीत पुलाखालून पाणी वाहून जाऊ लागले विकास पुरुषाच्या अनेक अपूर्ण कामांच्या गप्पांचे फळ रंगू लागले त्यांचे शागीर्द शड्डू ठोकून पाहून घ्या भाऊ नगरपरिषद करणारच असे काल्पनिक गावे करू लागले अशातच मार्च उजाडला आणि हिवरखेडकरांनी मिटलेले डोळे किलकिले केले पाहता पाहता मार्च निघून गेला एक आर्थिक वर्ष संपले भारताकडे दिलेली नगरपरिषद करविण्याची मुदत संपली एक एप्रिलला दुसरे आर्थिक वर्ष सुरू झाले एक एप्रिल हा मूर्ख बनविण्याचा जागतिक प्रतिष्ठा प्राप्त दिन या दिगंत किर्तिमान दिनी भारसाखळे यांनी आपल्याला मूर्ख बनविण्याचा उत्सव हिवरखेडकरांनी धुमधडाक्यात साजरा केला गावाच्या गल्लीबोळातून फिरत त्यांनी भारसाखळीन द्वारे मूर्ख बनल्या बाबत एकमेकांचे अभिनंदन केले ह्या फसवणुकीचे प्रतीक म्हणून गावकऱ्यांनी एकमेकांना लॉलीपॉप भेट दिले या अफलातून कल्पनेचे हिवरखेडात भन्नाट स्वागत झाले या उत्सवात गावातील लहान थोर मोठ्या उत्साहाने सामील झाले.
असे झाल्याने भारसाखळे यांचा होरा साफ चुकला. हिवरखेडकर आपली वल्गना विसरले असतील हा त्यांचा होरा होता. पण तसे झाले नाही. त्यामुळे हाता तोंडाशी असलेली नगरपंचायत हा हिवरखेडकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा असल्याचे दिसून येते. यासोबतच नगरपंचायतीवर स्थगिती आणण्याचा भारसाखळे यांचा कुत्सीतपणा हिवरखेडकरांच्या किती जिव्हारी लागलेला आहे याचीही प्रचिती येते. असे म्हणतात कि, वादळापूर्वी सर्वत्र निरव सामसूम असते. वातावरण निस्तब्ध असते. झाडेझुडपे स्थिर असतात. पण पुढच्याच क्षणी सोसाट्याचा वारा आपल्या पाठीशी भले मोठे वादळ घेऊन येतो. त्याचे थैमान सुरू होते. आणि बघता बघता होत्याचे नव्हते होऊन जाते. हिवरखेडकरांचा हा इशारा भारसाखळे यांनी ओळखावा आणि केवळ सही शिक्याकरिता रोखलेले हिवरखेड नगरपंचायतीचे काम पुर्णत्वास न्यावे हा त्यांना महाव्हाईसचा सल्ला आहे. अर्थात हा सल्ला त्यांना मानवणार नाही. कारण अहंकार हा त्यांचा स्थायीभाव त्यांना तसे करू देणार नाही. त्यामुळे निकट भविष्यात येणाऱ्या वादळाची प्रतीक्षा करणेच उचित ठरणार आहे.