आकोट – संजय आठवले
हिवरखेड – आकोट – दर्यापूर मार्गाने आकोट शहरातील कलदार चौक ते मोहाळी नदीपर्यंत तर श्री शिवाजी महाविद्यालयापासून ते खाई नदीपर्यंत डाव्या व उजव्या बाजूकडील नाली बांधकामाकरिता मागविलेल्या निवेदांनुसार डाव्या बाजूचे काम एका कंत्राटदारास देय झाले असतानाही कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारास हे काम मिळण्याकरिता या कामाची चक्क दिशाच बदलण्याची हात चलाखी केल्याचे निदर्शनास आले आहे.
आपल्या ज्ञाती बांधवाला हे काम मिळण्याकरिता त्यांनी केलेल्या या गैरकायदेशीर कृत्याची चर्चा चांगलीच रंगत असून त्या विरोधात तक्रारीही केल्या जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला, जागतिक बँक प्रकल्प अंतर्गत हिवरखेड – आकोट – दर्यापूर या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम प्रस्तावित होते. त्याकरिता या विभागाद्वारे सक्षम कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या.
त्या अंतर्गत हिवरखेड कडून आकोट मार्गे दर्यापूर कडे जाताना निश्चित होणाऱ्या डाव्या व उजव्या बाजूकडील नाली बांधकामाकरिता वेगवेगळ्या निविदा मागविल्या गेल्या. त्यानुसार हिवरखेड – आकोट – दर्यापूर मार्गालगत (RHS) अर्थात Right Hand Side म्हणजेच उजवी बाजू. ह्या कामाकरिता जे. बी. चंदन यांनी १२.५०% कमी दराची तर शिवाजी देशमुख यांनी १३.७०% कमी दराची निविदा सादर केली. यामध्ये सर्वात कमी दराची निविदा असल्याने ह्या कामाकरिता शिवाजी देशमुख हे पात्र ठरले. परंतु ह्या कामावर पुरेसा निधी नसल्याने हे काम होणे शक्य नव्हते.
याचवेळी हिवरखेड – आकोट – दर्यापूर मार्गालगत (LHS) अर्थात Left Hand Side म्हणजेच डावी बाजू. या कामाकरिता जे. बी. चंदन यांनी १३.५०% कमी दराची, चंद्रकांत चापके यांनी १५.५२% कमी दराची तर शिवाजी देशमुख यांनी १४.०१% कमी दराची निविदा सादर केली. या कामावर पुरेसा निधी उपलब्ध असल्याने आणि चंद्रकांत चापके यांची सर्वाधिक कमी दराची निविदा असल्याने ते या कामाकरिता पात्र ठरले. त्यामुळे त्यांना हे काम मिळणे क्रमप्राप्त होते.
परंतु कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक यांचे मनात काही वेगळेच शिजत होते. त्यांना हे काम शिवाजी देशमुख यांना द्यायचे होते. परंतु निविदा प्रक्रिया नियमांनी, निधी नसलेल्या उजव्या बाजूच्या कामाकरिता शिवाजी देशमुख यांना तर निधी प्राप्त डाव्या बाजूच्या कामाकरिता चंद्रकांत चापके यांना पात्र ठरविले होते. त्यामुळे हे काम देशमुखांना मिळण्याकरिता ते रस्त्याच्या उजव्या बाजूला दिसणे अनिवार्य होते. त्याकरिता सरनाईक यांनी आपल्या करामती बुद्धीचा कस लावला. आणि त्यांना “ध चा मा” करणारी कावेबाज शक्कल सुचली. त्यानुसार त्यांनी या कामाची दिशाच बदलून टाकली.
वास्तवात या कामाचे नाव आहे, हिवरखेड – आकोट – दर्यापूर मार्गानजीक डाव्या बाजूचे नाली बांधकाम करणे. त्यामुळे हिवरखेड कडून आकोट मार्गे दर्यापूर कडे जाताना मानवी शरीराची डावी बाजू गृहीत धरणेच अपेक्षित आहे. परंतु तसे गृहीत धरले तर उजव्या बाजूच्या कामाकरिता पात्र ठरलेल्या देशमुखला हे काम देता येत नाही. पण हीच दिशा दर्यापूर – आकोट – हिवरखेड अशी गृहीत धरली तर हे काम उजवीकडे येते. आणि त्यामुळे ते आपसूकच शिवाजी देशमुखकरिता देय ठरते. म्हणून मग सरनाईकांनी या कामाचे नावाप्रमाणे असलेली मूळ दिशाच बदलून टाकली.
परिणामी मूळ डावी बाजू उजवी झाली तर मूळ उजवी बाजू डावी झाली. असे केल्याने ज्या कामावर पुरेसा निधी नव्हता, ते मूळ उजव्या बाजूचे काम डाव्या बाजूचे झाले तर ज्या कामावर निधी होता ते मूळ डाव्या बाजूचे काम उजव्या बाजूचे झाले. अशी हातचलाखी केल्यावर कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक यांनी मूळ डाव्या बाजूच्या कामाकरिता पात्र ठरलेली चंद्रकांत चापके यांची निविदा रद्दबातल केली आणि शिवाजी देशमुखच्या पात्र निविदेनुसार बनवाबनवीने निश्चित केलेल्या उजव्या बाजूची देशमुखची निविदा स्वीकृत केली.
या दोन्ही कामांच्या निविदा प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या तुलनात्मक तक्त्यांचे अवलोकन केले असता, कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक यांची बदमाशी पुरेपूर ध्यानात येते. त्यांच्या अशा बदमाश्यांच्या अनेक सुरस कथा सार्वजनिक बांधकाम वर्तुळात ऐकावयास मिळतात. सरनाईक हे अतिशय जातीयवादी गृहस्थ असून आपल्या ज्ञातीतील लोकांना काम देण्याकडे त्यांचा ओढा असतो, अनेक कामांमध्ये त्यांची अप्रत्यक्ष भागीदारी आहे,
कंत्राटदारांच्या चुकीच्या कामांवर ते नेहमीच पांघरूण घालतात, त्याकरिता अधिकार क्षेत्रापलीकडे जाऊन कामे करतात, आमदार, खासदार इतकेच काय सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसमोरही ते खोटे बोलतात, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उद्दामपणे वागतात, अशा एक ना अनेक कहाण्या ऐकणारास सरनाईकांची महती सांगून जातात. आकोट – मुंडगाव – तेल्हारा तथा हिवरखेड – तेल्हारा आणि संतोष चांडक हा करीत असलेले आकोट शहरातील रेल्वे पुलापासून विश्रामगृहापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अंजनगाव मार्गावरील खाई नदीपर्यंतच्या रस्त्यांची कामे ही प्रवीण सरनाईकांच्या बदमाशीची उत्तम उदाहरणे आहेत.
श्री गिरीश जोशी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांचे पत्र क्रमांक अर्थ- का- ४(३) H AM ८३ & ८३ B/ २१-२२/९४७/ दि.४.३.२०२२ या पत्राचे अवलोकन केल्यास सरनाईकांच्या गैरवर्तनाची साक्ष मिळते. आताही त्यांच्या या निविदा बदल गैरवर्तनाची चांगलीच चर्चा असून त्या संदर्भात तक्रारीही करण्यात येणार आहेत.