आकोट – संजय आठवले
दि. ८ जानेवारी २०२५ रोजी आपल्या भाजप-निलंबनाला कारणीभूत असलेल्या आकोट तालुका व शहर अध्यक्षांचे घरासमोर निषेध मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर आणि आकोट मतदार संघातील निलंबितांसह चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या संदर्भात सदर निलंबन त्वरित मागे घेण्याचे आदेश दिल्याने ८ जानेवारी रोजी काढल्या जाणारा निषेध मोर्चा रहित करण्यात आल्याचे कु. चंचल पितांबरवाले यांनी सांगितले.
वाचकांना स्मरणच आहे कि, अकोला जिल्हा भाजप अध्यक्ष किशोर मांगटे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून आकोट मतदार संघातील ११ पदाधिकाऱ्यांना भाजपातून निलंबित केले होते. ही कारवाई आकोट तालुका व शहर भाजप अध्यक्ष यांचे अहवालावरून केल्याचे या निलंबन पत्रात स्पष्ट करण्यात आले होते.
या निलंबन पत्रामुळे आकोट मतदार संघातील भाजप गोटात प्रचंड काहूर उठले. या कारवाईच्या मागे आमदार प्रकाश भारसाखळे हेच असल्याचे बहुतांश लोकांचे मत पडले. परंतु विविध कारणांनी यातील दहा लोकांनी बराच काळ होऊनही हूं का चूं केले नाही.
परंतु कु. चंचल पितांबर वाले या युवा नेत्रीने मात्र या निलंबनाविरोधात आकाश पाताळ एक केले. तिने आकोट भाजपा तालुका व शहराध्यक्ष यांना चांगलेच टार्गेट केले. त्यामुळे या दोन्ही अध्यक्षांनी जमेल त्या मार्गाने पितांबर वाले यांना कुल डाऊन करण्याचा प्रयास केला.
परंतु ते प्रयास तप्त झालेल्या तव्यावर पडलेल्या पाण्याच्या थेंबागत वाफ बनून हवेतच उडाले. त्यातच या गोटाकडून काही विपरीत वृत्त कानावर आल्याने पितांबर वाले यांचे क्रोधाग्नित अधिकच तेल ओतले गेले. त्यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन ८ जानेवारी रोजी दोन्ही अध्यक्षांच्या घरासमोर निषेध मोर्चा नेऊन धरणे धरण्याचे ऐलान केले.
अशा गदारोळातच आकोट शहरात सहकार नेते नानासाहेब हिंगणकर यांचे अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात आमदार प्रकाश भारसाखळे यांची उपस्थिती राहणार होती. त्या औचित्याचा लाभ उचलणेकरिता या अध्यक्ष कंपू कडून एक कूट कारस्थान रचले गेले.
त्यानुसार नानासाहेब हिंगणकर यांचे सोहळ्यामध्ये चंचल पितांबरवाले ही आमदार भारसाखळे यांना काळे फासणार असल्याची खबर जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोचविली. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी आकोट ठाणेदार यांना सतर्क केले. पोलिसांनी चंचल पितांबरवाले यांना नोटीस बजावून असे कोणतेही अनुचित कृत्य न करणे बाबत सचेत केले.
परंतु नानासाहेबांची कौटुंबिक संबंधामुळे आपण त्यांचे सोहळ्यातला डाग लागू देणार नसल्याची भूमिका पितांबरवाले यांनी घेतली. त्यामुळे आमदार भारसाखळे यांचा जीव भांड्यात पडला. परंतु निलंबितांचा प्रश्न मात्र धगधगतच होता. सोबतच निषेध मोर्चाचा एपिसोडही अद्याप बाकीच होता.
याच दरम्यान ह्या अकराही निलंबितांनी आपली मोट बांधून वरपर्यंत जाण्याचा चंग बांधला. त्यानुसार या सार्यांनी नागपूर मुक्कामी भाजपा प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
त्यांनी या निलंबितांची त्वरित दखल घेऊन या संदर्भात आपणास सगळेच ठाऊक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजप अनुशासन समितीचे विदर्भ अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांचेशी संपर्क साधून ह्या अकराही जणांचे निलंबन त्वरित मागे घेण्याच्या त्यांना सूचना दिल्या.
ह्या सूचने सोबतच या निलंबितांनी पुढील कारवाया स्थगित करून आपल्या आदेशाची प्रतीक्षा करावी, असंही बावनकुळे यांनी निलंबितांना बजावले. त्यामुळे निलंबन प्रकरणी आपली सरशी झाल्याचे निलंबितांनी मनोमन जाणले. आणि प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेशाचे पालन म्हणून कुमारी चंचल पितांबर वाले यांनी ८ जानेवारी चा मोर्चा रहित करून प्रांताध्यक्षांच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला.