चंद्रपूरच्या राजुरा शहरात धक्कादायक घटना घडल्याची समोर आली आहे. काल रविवारी रात्रीच्या सुमारास काही लोकांनी केलेल्या गोळीबारात स्थानिक भाजप कार्यकर्त्याची पत्नी ठार झाली आणि एक व्यक्ती जखमी झाला आहे. पूर्वशा सचिन डोहे (वय 27) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. पूर्वशा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन यांची पत्नी आहे. या गोळीबारात लल्ली नामक आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. जखमीला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सोमनाथपुर वार्डात रात्री नऊच्या सुमारास अज्ञातांनी सचिन डोहे यांच्या घरासमोरून एका व्यक्तीवर गोळीबार केला असल्याने गोळीबाराचा आवाज ऐकून पूर्वशा घराबाहेर आल्या. यात पूर्वशा यांना दोन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जुन्या वैमनस्यातून सोमनाथपूर वॉर्डातील रहिवासी असलेल्या लल्ली शेरगिलची हत्या करण्यासाठी हल्लेखोर जिल्हा मुख्यालयापासून २९ किमी अंतरावर असलेल्या राजुरा येथे आले होते.
पोलिसांनी सांगितले की, शेरगिलला याची माहिती मिळताच तो भाजपच्या युवा शाखेचा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे याच्या मित्राच्या घरात घुसला. यादरम्यान हल्लेखोरांनी शेरगिल यांना मारण्यासाठी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तेवढ्यात सचिन डोहे यांची पत्नी पूर्वा घरासमोरील अंगणात आली.
पूर्वा यांच्या छातीत गोळी लागल्याने ती जागीच पडली, तर शेरगिल यांच्या पाठीत गोळी लागली. दोघांनाही राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तेथे महिलेला मृत घोषित करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या शेरगीलला उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजुरा पोलिस ठाण्याचे अधिकारी विशाल नागरगोजे यांनी सांगितले की, आम्ही याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. जुन्या वैमनस्यातून आरोपींनी शेरगिल यांच्या हत्येचा प्रयत्न केला.