Chandra Grahan 2022 : दीपावलीच्या मुहूर्तावर झालेल्या सूर्यग्रहणानंतर उद्या ८ नोव्हेंबरला या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे वर्षातील दुसरे चंद्रग्रहण असेल, जे देशाच्या ईशान्य भागात पूर्णपणे दिसेल. उर्वरित भागात आंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. देशातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेशात दिसेल, त्यानंतर ते इतर भागांमध्ये दिसेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
भारतात पहिले चंद्रग्रहण कुठे दिसणार?
भारतात पहिल्यांदाच अरुणाचल प्रदेशात चंद्रग्रहण दिसणार आहे. यानंतर ते गुवाहाटी, रांची, पाटणा, सिलीगुडी, कोलकाता येथेही दिसेल. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीतही चंद्रग्रहण पाहता येणार आहे. तर राज्यात मुंबईत ६ वाजून १ मिनिटांनी अंशतः दिसणार असल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सोबतच ईशान्य भारतातील काही भागांमध्ये पूर्ण चंद्रग्रहण दिसेल, तर इतर भागांमध्ये ते अंशतः दिसेल.
देशात चंद्रग्रहणाची वेळ?
भारतात चंद्रग्रहणाची सुरुवात चंद्रोदयाने होईल. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.23 ते 6.19 या वेळेत चंद्रग्रहण होईल. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:28 आहे.
भारताशिवाय ते कुठे पाहायला मिळेल?
भारताव्यतिरिक्त, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर, ईशान्य युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतांश भागांवर दिसणार आहे. त्याचबरोबर दक्षिण पश्चिम युरोप आणि आफ्रिकेत हे ग्रहण दिसणार नाही.